BREAKING ते आले, चाबीने कुलूप उघडले, चोरी केली आणि परतले! बुलढाण्यात आगळी वेगळी चोरी..
Jul 6, 2024, 19:47 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दिवसेंदिवस बुलढाणा शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाच महिन्यात ९ घरफोडीच्या घटना घडून गेल्या असून याबाबत बुलडाणा लाइव्हने काही दिवसांपूर्वीच वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, घरफोडी, चोरींच्या घटना थांबता थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र शहरात निर्माण झाले आहे. काल ५ जुलैच्या रात्री तार कॉलनी भागात एक आगळा वेगळी चोरीची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सुनील राजेंद्र जगताप यांनी याबाबत आज ६ जुलैला दुपारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शुक्रवारी रात्री ७ ते सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सुनील जगताप हे मूळचे सावळा गावचे आहेत. पण त्यांचा रहिवास सध्या शहरातील तार कॉलनीमध्ये आहे. त्यांचे एक हॉटेल असून हॉटेलचा कारभार ते सांभाळतात. दरम्यान शुक्रवार रात्री, त्यांच्या घरी कोणीच नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्या हॉटेलात मुक्काम केला. रात्रीच्या वेळेस काही अज्ञात चोरटे घरासमोर आले.
त्यांनी घराची चावी हुडकली, बाहेर ठेवण्यात आलेल्या एका बुटातून चावी काढत शांतपणे घराचा दरवाजा उघडला. चोरटा की, चोरटे माहिती नाही पण घरात शिरले. जणू, जगताप यांच्या घरावर पाळत ठेवून हा चोरीचा कट रचला असावा असे निदर्शनातून दिसून येते. बरोबर घरातील लॉकरसमोर चोरटा गेला. लॉकर उघडून २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, १५ ग्राम इतर सोन्याचे दागिने असा एकूण ९५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. सुनील जगताप हे सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना ही बाब दिसून आली. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनतर आज दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. तक्रारीवरून, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धारकरी करीत आहेत.