BREAKING खळबळजनक ! बुलढाण्याच्या त्रिशरण चौकात गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले! तीन गाई आणि वाहन जप्त ; पण 'असे ' झाले आरोपी फरार..
Jul 10, 2024, 11:14 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आज १० जुलैच्या पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास ३ गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले असून तीन गाई आणि वाहन जप्त करण्यात आहे. मात्र चालाखीने काही अंतरावर वाहन थांबवून आरोपी रात्रीच्या अंधारात पसार झाल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच.०५ ए.एक्स.१२१३ क्रमांकाची झायलो कंपनीच्या चारचाकी वाहनामध्ये गोवंश जनावर कोंबून शहरातील जयस्तंभ चौकातून चिखली रोडच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने त्रिशरण चौक येथे नाकाबंदी लावली.
सदर वाहन त्रिशरण चौकाजवळ पोहोचत असताना वाहन चालकाला समोर पोलीस दिसून आले. त्यांनतर वाहन जागीच सोडून चालक आणि इतर तिघे पळून गेले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील व त्यांचे पथक पोहोचले. परंतु रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाले. त्यावेळी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला, मात्र गडद अंधारात फरार होण्यास आरोपींना यश आले. गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन आणि तीन गाई पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. चालकासह, तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव खवले करीत आहेत.