BREAKING जळगाव जामोद येथील लाचखोर वनपाल गजाआड! दहा हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने पकडले रंगेहाथ..

 
जळगाव
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने दहा हजारांची लाच स्वीकारल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती मिळताच काल, ६ एप्रिलला सापळा रचून कारवाई करण्यात आली, दरम्यान वनपाल शेख कलीम शेख बिबन (४८ वर्ष) याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्यावर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
 वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे वन विभागाच्या सालई गोंद अवैधरित्या जमा केल्याबाबत एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या गुन्ह्यात दाखल झालेला व्यक्ती आरोपी सिद्ध न व्हावा यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन याने दहा हजारांची मागणी केली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनतर काल ६ मे रोजी , जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी वनपाल शेख कलीम याला दहा हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. सदर कारवाई, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (एसीबी बुलढाणा) श्रीमती शितल घोगरे , निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक फौजदार श्याम भांगे, हवालदार प्रवीण बैरागी, हवालदार विनोद लोखंडे, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, चालक हवालदार नितीन शेटे, हर्षद शेख यांनी पार पाडली.