BREAKING बकरी चोरांचा 'कार' नामा; चोरी केलेल्या बकऱ्यांची वाहतूक कारमधून ! बोराखेडी पोलिसांनी तिघांना कोथळी भागात पकडले..
May 16, 2024, 19:08 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चोरी केलेल्या बकऱ्यांची वाहतूक रोखून तिघा चोरट्यांना आज दुपारी कोथळी येथे बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. प्रकरणी खामगाव तालुक्यातील तिघांविरोधात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाहन ताब्यात घेतले आहे.
सुरज आनंदा हिवराळे (२३ वर्ष) रा. चितोडा ता. खामगाव , रविकांत जनार्धन हिवराळे (३७ वर्ष) रा. अंबिकापुर चितोडा, आशिष रवींद्र वानखडे (२३ वर्ष) अशी आरोपींची नावे असून त्यांच्या जवळील एम.एच ०३ बीसी ३२८७ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर जप्त करण्यात आली आहे. गाडीमधून बकऱ्यांची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर तात्काळ दुपारी ४:३० वाजेच्या दरम्यान पोलिसांनी कोथळी गाठले. तत्पूर्वी गावातील लोकांनी वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. अखेरीस वाहन पकडून तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे एका दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील इंदिरा नगर भागातून दिवसाढवळ्या ८ बकऱ्या चोरी झाल्या होत्या. याघटनेशी वरील आरोपींचा सबंध असण्याची शक्यता आहे. अशी माहिती ठाणेदार सारंग नवलकार यांनी बुलढाणा लाइव्हशी बोलताना दिली.