BREKING! स्टंटबाजी महागात पडली; हिवरा आश्रम च्या विवेकानंद स्मारक असलेल्या धरणात भानखेड चा रोशन इंगळे बुडाला! एकाला वाचवण्यात यश..! मुलींना इंप्रेस करण्यासाठी केला होता स्टंट....

 
नंदन
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथून खळबळजनक बातमी समोर येत आहे. मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दोन तरुणांनी बोटीतून तलावात उडी मारली. त्यापैकी एक धरणात बुडाला असून दुसऱ्याला वाचवण्यात यश आले आहे. हिवरा आश्रम जवळ असलेल्या शेवगा शिवारातील विवेकानंद स्मारक असलेल्या बेटाजवळील धरणात आज,२२ जूनच्या दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली आहे.
रोशन मुराजी इंगळे ( २२,रा. भानखेड, ता: चिखली) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रोशन त्याचे मित्र अजय किशोर इंगळे, ऋत्विक भारत सोनोने, लक्ष्मण गजानन इंगळे, अनिकेत गणेश सुरडकर यांच्यासोबत हिवरा आश्रम येथे फिरायला गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास हे सर्वजण विवेकानंद स्मारक असलेल्या बेटावर जाण्यासाठी स्थानिक बोटचालक गुलाब कांबळे यांच्या बोटीतून निघाले. यावेळी बोटीत या पाच जणांसह काही कॉलेज तरुणी व इतर मुले देखील होती. दरम्यान बेट साधारणत ४०० ते ५०० मीटर अंतरावर असताना रोशन इंगळे व त्याच्या एका मित्राने बोटीतून पाण्यात उडी मारली. दोघांनाही पोहणे असल्याने त्यांनी मुलींना पाहून स्टंट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र उडी मारली तेथून बेट अंतरावर असल्याने दोघांचा दम तुटू लागला. बोटचालक गुलाब कांबळे यांनी बोटितील इतर विद्यार्थ्यांना बेटावर सोडून दोघांना वाचवण्यासाठी ते माघारी फिरले. मात्र त्यांना रोशन च्या मित्राला वाचवण्यात यश आले.रोशन धरणात बुडाला. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, सध्या मेहकरचे तहसीलदार व बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी असून रोशनचा शोध घेणे सुरू आहे. रोशन गाळात फसला असावा असा अंदाज आहे.
ब्ध
 दुपारी बोटीत काढलेला फोटो बुलडाणा लाइव्ह च्या हाती..!
सकाळ पासून पाचही मित्रांची ट्रीप अगदी आनंदात सुरू होती. त्यांचे फोटोसेशन देखील सुरू होते. दरम्यान दुपारी बोटीतून प्रवास करतेवेळी देखील त्यांनी फोटो काढले. त्यापैकी एक फोटो बुलडाणा लाइव्ह ला प्राप्त झाला आहे. त्यात रोशन काळा गॉगल आणि काळ्या रंगाचे शर्ट घातलेला दिसत आहे. दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी हा फोटो काढलेला आहे. त्या फोटोत रोशन व त्याचे मित्र अतिशय आनंदी दिसत आहेत. मात्र त्यानंतर काही मिनिटांच्या आतच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. रोशनच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी अपघात निधन झाले असून तो आईवडिलांना एकुलता एक होता.