BREAKING! बापानेच केला मुलाचा खून; झोपलेल्या लेकावर कुऱ्हाडीने केले सपासप वार; कारण आहे धक्कादायक...

 
जळगाव जामोद:( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जन्मदात्या बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज ,१४ मार्चला जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे ही घटना घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे खून कुणी केला हे सुरुवातीला समोर आले नव्हते त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र काही तासातच संशयाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून खून करणाऱ्या आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
 प्राप्त माहितीनुसार शिवाजी प्रल्हाद रायपूरे(३३, रा. आसलगाव) असे मृतकाचे नाव असून प्रल्हाद रायपूरे(६५) असे नराधम पित्याचे नाव आहे. शिवाजी रायपुरे याने राहत्या घरात स्वतःच्या मानेवर जखमा करून मृत्यूला कवटाळले असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना आज सकाळी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता काहीतरी गडबड असल्याची पोलिसांची खात्री झाली. मृतक शिवाजीच्या मानेवर असलेल्या जखमा पाहून हा खून असल्याची पोलिसांची खात्री झाली. नेमका आरोपी कोण हे माहीत नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
  त्यानंतर पोलिसांनी एसपी सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे हलवली. श्वानपथक फिंगरप्रिंट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मृतक शिवाजीचे जवळचे नातेवाईक, आई वडील यांना विचारपूस करण्यात आली...
   खुनाचे कारण...
दरम्यान काल रात्री मृतक शिवाजी आणि त्याच्या वडीलांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पोलिसांना कळाले. वडील प्रल्हाद रायपुरे नेहमी दारूच्या दुकानावर जातात, दारू पितात त्यामुळे आपला अपमान होतो असे शिवाजीला वाटत होते. तुम्ही जर नेहमी दारू पित असाल तर येथे राहू नका असे मयत शिवाजीचे वडिलांना म्हणणे होते. या वादातूनच वडील प्रल्हाद रायपूरे रात्रीच कपड्याची थैली घेऊन दारूच्या नशेत निघून गेले होते. रात्री जेवणानंतर शिवाजीची आई बाजूच्या खोलीत नातवंडांसह झोपली तर शिवाजी बाजूच्या खोलीत झोपला होता.आज सकाळी शिवाजीची आई झाडू घेण्यासाठी खोलीत गेली असता मुलगा शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दरम्यान पोलिसांनी संशयावरून शिवाजीच्या वडिलांना ताब्यात घेतले, कसून चौकशी केल्यानंतर स्वतः खून केल्याची कबुली दिली..
नेमकं काय घडलं?
 
 शिवाजीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की,शिवाजी हा नेहमी त्रास द्यायचा, त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून शिवाजी खोलीत झोपलेला असताना रात्री १ वाजता कुऱ्हाडीने ५ - ६ वार करून त्याचा खून केल्याची कबुली प्रल्हाद रायपुरे याने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास एसपी कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी, ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग इंगळे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस उपनिरीक्षक दोडके, अमोल पंडित, पोहेका उमेश शेगोकार, निलेश पुंडे, पोकॉ सचिन राजपूत यांनी केला.