वारी हनुमान येथील नदीच्या डोहात बुडून मुलाचा मृत्यू! १७ तासानंतर सापडला मृतदेह

 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तिन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वारी हनुमान येथील आर नदीच्या डोहात बुडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान घडली.

वारी हनुमान मंदिरात असंख्य नागरिक दर्शनासाठी येतात, नवस म्हणून भंडारे देतात. त्यामुळे दररोज भक्त व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांच्या गर्दीने परिसर फुललेला असतो. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील अल्पवयीन मुलगा वारी हनुमान आर नदीपात्रातील डोहात आंघोळ करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उतरला. मात्र, पोहता येत नसल्याने खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतक मुलाचे नाव अनिकेत संजय मुरोदे (वय १६) रा. हिवरखेड असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी परिसरातील पोहणारे व नातेवाईकांनी रात्री उशीरा पर्यंत शोध घेतला असता मिळून आला नाही. 

 दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी सकाळी ८ वाजता मृतदेह बाहेर काढून सोनाळा पोस्टेचे पोहेकॉ मोहिद्दीन सैय्यद यांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अनिकेतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.