भाजपा आमदार संजय कुटेंनी दलीत महिला सरपंचांचा कार्यक्रमात केला अवमान; आमदारांविरुद्ध पोलिसात तक्रार

 
Police
संग्रामपूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी जाहिर कार्यक्रमात खासदार प्रतापराव जाधव यांच्या हजेरीत व व्याससपीठावरच दलित महिला सरपंचाचा अवमान केला . तसेच सरपंच पद काही मोठे नसते असा उल्लेख केला.
 यानंतर सभास्थळ सोडलेल्या सरपंचांनी तामगाव पोलिसांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली.जळगाव जामोद मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडले. यादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील एका पुलाचेही भूमिपूजन पार पडलं. यावेळी जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरवट बकालच्या दलित महिला सरपंच संगीता इंगळे यांनी आपल्या भाषणात वरवट बकाल येथे कार्यान्वित 'डायलिसिस सेंटर' वर स्थानिक सरपंचाचे नाव डावलल्याचा मुद्दा उपस्थित केला. मी दलित असल्यामुळे माझं नाव वगळण्यात आल्याचा थेट आरोप त्यांनी केला. यामुळे सभास्थळात खळबळ उडाली. खासदार प्रतापराव जाधव यांच्या समोरच हा आरोप केल्याने आ. संजय कुटे यांचा पारा चढला व त्यांनी महिला सरपंचांना भाषण थांबवण्याचे फर्मान दिले. यावर महिला सरपंच भाषण आटोपत घेत संजय कुटे यांच्या बाजूला बसल्या. यावेळी खासदारांचे भाषण सुरु असतानाच आमदार कुटे यांनी सरपंच इंगळे यांना धारेवर धरलं. यामुले सरपंच इंगळे सभेतून निघून गेल्या. 
सरपंच थेट पोलिसात
  दरम्यान सरपंच पदाला तुच्छ लेखून महिलेचा अवमान करणे आमदार कुटे यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. आमदार कुटे यांच्या विरोधात सरपंच इंगळे यांनी तामगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत संजय कुटे यांनी मी दलित असल्याने, माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, अस सरपंच इंगळे यांनी म्हटल आहे. दरम्यान आज रविवारी सकाळी विचारणा केली असता, 'हे प्रकरण चौकशीवर असल्याचे' तामगाव पोलिसांनी सांगितले . या प्रकरणी आमदारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
रिपाइंचे खरात यांची कारवाईची मागणी...
दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते सचिन खरात यांनी घटनेचा निषेध केला आहे कुटे यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी भाजपा नेते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.