मोठी बातमी! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल! अटक होण्याची शक्यता...

 
bondre
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर यांनी आपल्या वडिलांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा  आरोप करीत राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज,१७ मार्चच्या सकाळी वाकदकर यांना मारहाण केली होती. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाकदकर यांचे बयाण नोंदवून चिखली पोलिसांनी राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केल्याने राहुल बोंद्रे यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.

 काही दिवसांपूर्वी राहुल बोंद्रे यांचे वडील तात्यासाहेब बोंद्रे यांचे निधन झाले होते. दरम्यान त्यानंतर श्याम वाकदकर यांनी आपल्या वडिलांबद्दल फेसबुक वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करीत राहुल बोंद्रे यांनी व त्यांच्या समर्थकांनी वाकदकर यांना मारहाण केली. या मारहाणीत वाकदकर यांच्या कानाचा पडदा फाटल्याचे सांगितल्या जात आहे. राहुल बोंद्रे यांनी आपल्याला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला असे वाकदकर यांनी पोलिसांना सांगितले, त्यामुळे बोंद्रे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, याशिवाय इतर गंभीर कलमांचा समावेश देखील पोलिसांनी केल्याने राहुल बोंद्रे यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुल बोंद्रे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करतात की त्यापूर्वीच त्यांना पोलीस  अटक करतात याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.