मोठी बातमी! जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या घरफोडीची उकल करण्यात LCB ला यश! ४० लाखांचे हिरे,सोने,चांदी जप्त! ११ बड्या आरोपींना बेड्या!१५ जानेवारीला झाली शेगावात होती घरफोडी

 
Gujb
बुलडाणा (राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):१५ जानेवारीला शेगाव येथील आनंद पालडीवाल यांच्या घरी मोठा दरोडा पडला होता.२५ लाखांच्या रोख रकमेसह सोन्याचे, चांदीचे, हिऱ्याचे दागिने असा ९२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते. अखेर पोलीस अधीक्षक  सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एलसीबी ने दरोडेखोरांचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे. एकूण ११ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 

 १५ जानेवारीला शेगाव येथील आनंद पालडीवाल यांच्या घरी झालेली ही चोरी जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे.  घटनेच्या दिवशी आनंद पालडीवाल  त्यांच्या आईच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी जालन्याला गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला होता.

   
 असा झाला तपास..!

 जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चोरीचा तपास करण्याचे मोठे आवाहन जिल्हा पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलिस अधीक्षक,२ अप्पर पोलीस अधीक्षक, खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात , तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनात  कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. याशिवाय सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणासाठी सुद्धा सायबर शाखेचे एक पथक नेमण्यात आले.
  
 दरम्यान सायबर शाखेकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील वैभव नंदू मानवतकर (२६) याला नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्यातून त्याच्या इतर १० साथीदारांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी एकेक करीत सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ११ पैकी ७ आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्यातील अनेकांवर खून, दरोड्यासारखे गुन्हे राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
  
  ही आहे आरोपींची यादी..!

१) वैभव नंदू मानवतकर(२६, सोनाटी, ता मेहकर), २)मुंजा तुकाराम कहाते (२०), प्रीतम अमृतराव देशमुख (२९, दोघे रा. पिंप्री,देशमुख, जि.परभणी), अजिंक्य दिंगबर जगताप(२७,रा. पुंगळा, जि. परभणी), नवनाथ विठ्ठल शिंदे (१९, रा.गंगाखेड, जि.परभणी), कैलास लक्ष्मण सोनार (२४, रा. जेलरोड,नाशिक), मयूर राजू ढगे (२२, रा.निफाड), सौरभ राजू ढगे (२६, रा.निफाड), सुजित अशोक साबळे ( २७, रा. खडक मालेगाव, ता.निफाड), प्रवीण दीपक गांगुर्डे (२८, रा.सातपूर, नाशिक), सौ पूजा प्रवीण गांगुर्डे (२९, रा. सातपूर, नाशिक)
     
दोन सख्खे भाऊ, पती - पत्नीही चोरट्यांच्या यादीत..!

   पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मध्ये २ सख्खे भाऊ व एक पती पत्नीचे जोडपेही आरोपी निघाले.  मयूर राजू ढगे (२२) आणि सौरभ राजू ढगे (२६, दोघे रा.निफाड) हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर आरोपी प्रवीण गांगुर्डे आणि  पूजा गांगुर्डे हे पती पत्नी आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे तिशीच्या आतले आहेत हे विशेष!