मोठी बातमी! झारखंडचे ATS बुलडाण्यात!!

संग्रामपूर तालुक्‍यात छापेमारी, १४ पिस्‍तूल, १६० जीवंत काडतुसे जप्त, तिघांना उचलले
 
ats

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः झारखंड राज्यात सध्या नक्षल्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सीआरपीएफमध्ये काम करणाऱ्या अविनाश उर्फ चुन्‍नू कुमार या जवानाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. वेगवेगळी घातक शस्‍त्रे नक्षल्यांना व गुंडांना पुरविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्या चौकशीत त्याने नक्षलवाद्यांना व गुंडांना शस्‍त्रे विकल्याची कबुली दिली आहे. त्‍याच्‍याकडून हाती आलेल्या महत्त्वाच्‍या माहितीवरून, झारखंड दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २० नोव्‍हेंबरला सकाळी दहाच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातही छापेमारी केली. मध्यप्रदेशातून  जिल्ह्यात शस्रे विकण्यासाठी आलेल्या तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून १४ देशी पिस्तुल व तब्बल १६० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. टुनकी (ता. संग्रामपूर) येथे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

झारखंड राज्यात नक्षल्यांकडून घातक शस्‍त्रे जप्त करण्यात आली. पकडलेल्या अविनाश कुमार व अन्य तिघांच्या चौकशीत ही संपूर्ण साखळीच उजेडात येण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील पाचोरी येथून काही शस्‍त्रे झारखंड राज्यातील नक्षल्यांना पुरविण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे झारखंड एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून पाचोरी येथे संपर्क साधून पिस्तुल व काडतुसे खरेदी करण्याची बोली केली होती. त्यानुसार पाचोरीवरून शस्‍त्रे घेऊन तिघे जण रात्रीच पाचोरी ते टुनकी असा २० कि.मी. प्रवास पायीच जंगलातून करून टुनकी (ता. संग्रामपूर) येथे दाखल झाले. या ठिकाणी आधीपासून हजर असलेल्या झारखंड एटीएसच्‍या जाळ्यात तिघे अलगद अडकले. अटक करण्यात आलेले तिघेही तरुण २० ते २५ या वयोगटातील आहेत. ज्याने शस्‍त्रे पाठविली तो मुख्य आरोपी मात्र अद्याप फरारी आहे.