मोठी बातमी! चिखली पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल! हिंदुराष्ट्रसेनेच्या धनंजय देसाई, विजय पवारांसह १८ जणांचा समावेश;
मकरध्वज खंडाळ्यात परवानगी नसताना कार्यक्रम घेऊन सामाजिक वातावरण खराब केल्याचा पोलिसांचा आरोप

मकरध्वज खंडाळा येथील एका वास्तूवर दोन समाजाचा दावा आहे. त्यामुळे तो तणावाचा विषय असल्याने पोलिसांनी हिंदुराष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारत गावात जमावबंदीचे आदेश दिले होते. याशिवाय आयोजकांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती. २६ मार्चला धनंजय देसाई आले नाहीत मात्र जिल्हाध्यक्ष विजय पवार व हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे धनंजय देसाई यांचे लाइव्ह भाषण लोकांना ऐकवले. हिंदुराष्ट्र सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण केले. स्वतः विजय पवार यांनीदेखील सामाजिक वातावरण बिघडेल असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पोलिसांच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे धनंजय देसाई, विजय पवार, राजेश पिंगळे, रामकृष्ण सिद्धेश्वर ठेंग, गजानन महाराज ठेंग, ज्ञानेश्वर प्रकाश ठेंग, मधुकर मुरलीधर ठेंग, गजानन महाराज सपकाळ व इतर ९ ते १० अशा १७ ते १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.