BIG BREAKING पुन्हा महिलेचा जळालेला मृतदेह आढळला! किनगाव राजा - सिंदखेडराजा रोडवर गायकी ढाब्यामागे घडली घटना;

असोला मर्डर प्रकरणातील आठवणी ताज्या, असोला प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना सपशेल अपयश...
 
किनगावराजा
किनगावराजा(निलेश डिघोळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. सिंदखेड राजा मेहकर रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी शिवारात एका महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. महिलेचा चेहरा पूर्णपणे जाळण्यात आला आहे, शिवाय हाताची बोटे देखील तोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असावे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून या घटनेने २२ जानेवारी रोजी चिखली तालुक्यातील असोला शिवारात झालेल्या मर्डर प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे असोला प्रकरणाला ५ महिने उलटून जाऊन देखील अंढेरा पोलिसांना या प्रकरणातील गूढ उकलता आले नाही,त्या तरुणीची ओळख देखील अंढेरा पोलीस आणि तपासासाठी गठित केलेल्या एलसीबी पथकाला पटवता आलेली नाही. आता पुन्हा तशीच घटना समोर पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
   प्राप्त माहितीनुसार किनगाव राजा पासून अंदाजे ५ किमी अंतरावर असलेल्या गायकी ढाब्यामागे एका महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे. चेहरा जळालेला असल्याने महिलेची ओळख पटलेली नाही. महिला कोण? तिला कुणी आणि का जाळले? महिलेवर अत्याचार करून तर कुणी जाळले नाही ना? यासह अनेक प्रश्न आता पोलिसांना पडले आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.