BIG BREAKING खळबळजनक! चिखली शहरात दरोडेखोरांचा हैदोस;
६ दरोडेखोर मागचा दरवाजा तोडून घरात घुसले, महिलेच्या डोक्यात रॉड टाकला, हात मोडला! पतीलाही बेदम मारले अन्....
Feb 3, 2024, 08:53 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातून एक धक्कादायक आणि तेवढीच खळबळजनक बातमी समोर आली आहे. चिखली शहरातील गजानन नगर परिसरातील एका घरात ६ दरोडेखोरांनी हैदोस घातला. घराचा मागचा दरवाजा तोडून घरात शिरून पती पत्नीला बेदम मारहाण केली. या घटनेत दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत, दोघांवर चिखलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार गजानन नगरातील गजानन नवले यांच्या घरी आज मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी हैदोस घातला. गजानन नवले आणि त्यांच्या पत्नी अलका नवले या घरात झोपलेल्या होत्या तर नवले यांचे भाऊ पप्पू नवले हे समोरच्या खोलीत झोपलेले होते. पावणे दोन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या ६ दरोडेखोरांनी गजानन नवले यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
दरोडेखोरांनी तोंडावर बांदरटोपी घातलेली होती, त्यांचे केवळ डोळे दिसत होते. दरोडेखोरांच्या हाती लोखंडी रॉड होते. दरोडेखोरांनी दोघा पती पत्नीला उठवून सोने कुठे, पैसे कुठे याची विचारणा केली, शिवाय अलका नवले यांच्या हातावर रॉड मारून हात मोडला ,डोक्यात रॉड टाकला आणि गजानन नवले यांना देखील बेदम मारहाण केली. यावेळी अलका नवले यांनी जोरात आरडाओरड केल्याने समोरच्या खोलीत झोपलेले पप्पू नवले धावत गेल्याने दरोडेखोरांनी चारचाकी वाहनातून पळ काढला..
गंभीर जखमी पती पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून अलका नवले यांच्या डोक्यात ३५ टाके पडले आहेत. या घटनेनंतर माजी नगरसेवक दत्ता सुसर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. घटनास्थळी रात्रीच पोलीस दाखल झाले होते, पुढील तपास सुरू आहे.