


BIG BREKING! खामगावच्या बोरीआडगावात मध्यरात्री दरोडा; घरमालकाला व घरातील महिलांना चाकूने भोसकले; घरात रक्ताचा सडा..! दरोडेखोरांचा सोनेचांदी व रोख रकमेवर डल्ला पण मोटारसायकल तिथेच सोडून गेले
May 31, 2023, 07:58 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील बोरीआडगावात मध्यरात्री राडा झाला. गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील घरावर ६ ते ७ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या घरमालकाला आणि घरातील महिलांना दरोडेखोरांनी चाकूने भोसकले, काठ्यांनी झोडपले. त्यामुळे घरात अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता.
प्राप्त माहितीनुसार बोरी आडगाव येथील मारोती तायडे यांचे घर गावापासून काही अंतरावर शेतात आहे. रात्री अकराच्या सुमारास ६ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकला. यावेळी तायडे कुटुंबीयांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी सोबत आणलेल्या चाकूने तायडे कुटुंबावर हल्ला चढवला. यामध्ये वैभव मारोती तायडे(२८), गौरव मारोती तायडे (२५) , सौ. सुधाबाई मारोती तायडे(६५) आणि ज्योती मारोती तायडे(४५) असे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खामगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांनी तायडे यांच्या घरातील सोने ,चांदी व रोख रकमेवर डल्ला मारला. यावेळी दरोडेखोरांनी सोबत आणलेली एक मोटारसायकल (एम एच २८, ए टी १८७९) घटनास्थळीच ठेवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.