भरधाव टिप्परची क्रूझरला धडक; १ ठार, १३ जखमी

नांदुरा तालुक्यातील घटना
 
 
file photo

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चुरीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने क्रूझरला धडक दिली. या भीषण अपघातात क्रूझरमधील १ जण ठार तर १३ जण जखमी झाले. जखमींपैकी १२ जण एकाच परिवारातील आहेत. ही घटना नांदुरा -जळगाव जामोद रोडवरील नवी येरळी (ता. नांदुरा) गावाच्या गजानन महाराज मंदिराजवळ आज, २५ नोव्हेंबरला दुपारी दोनच्या सुमारास घडली. तुळशीराम मोतीराम सुरळकर (६५, रा. पलसोडा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पलसोडा (ता. नांदुरा) येथील सुरळकर परिवार क्रूझरने नांदुऱ्याहून पलसोडा येथे जात होता. नवी येरळी गावाजवळ जळगाव जामोदकडून येणाऱ्या भरधाव टिप्परने क्रूझरला धडक दिली. यात क्रूझरच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघातातील जखमींना तातडीने नांदुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी तुळशीराम मोतीराम सुरळकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले तर उर्वरित जखमींवर नांदुरा येथेच उपचार सुरू आहेत. रुख्माबाई नागोराव सुरळकर, समाधान शंकर सुरळकर, ओंकार पंढरी सुरळकर, नागोराव ओंकार सुरळकर, बारसु ओंकार सुरळकर, तुकाराम सदानंद चांभारे, अंजनाबाई ओंकार सुरळकर, निर्मला किसन सुरळकर, गजानन प्रल्हाद सुरळकर, दौलत नारायण सुरळकर, सुभाष शंकर सुरळकर, वैष्णवी बारसू सुरळकर, मीराबाई नागोराव सुरळकर (सर्व रा. पलसोडा) अशी जखमींची नावे आहेत.