सावधान! केवायसीच्या बहाण्याने साखरखेर्डाच्या हार्डवेअर व्यावसायिकाला लागला लाखोंचा चुना! बुलढाणा सायबर पोलिसांत दिली तक्रार..

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तुमच्या सुद्धा मोबाईलवर इकेवायसी अपडेटचा मेसेज आला तर सावधान रहा! कारण बातमीच तशी आहे.. ईकेवायसी अपडेट करण्याचे नावाखाली साखरखेर्डा येथील एका हार्डवेअर दुकान मालकाला लाखो रुपयांचा चुना लागल्याची बातमी आहे. याप्रकरणी हार्डवेअर दुकानमालक हेमंत लाहोटी यांनी बुलडाणा सायबर पोलीस ठाण्यात रविवारी, २८ एप्रिलला तक्रार दिली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हेमंत लाहोटी हे मेहकर येथील रहिवासी आहेत. त्यांचे साखरखेर्डा येथे चिंतामणी ट्रेडिंग कंपनी नावाचे हार्डवेअर दुकान आहे. यामुळे साखरखेर्डा ते मेहकर असा दररोजचा बस प्रवास ते करतात. लाहोटी यांचे साखरखेर्डा येथील स्टेट बँक शाखेत चालू खाते आहे. त्यात लाखोंची रोकड त्यांनी ठेवली होती. दरम्यान रविवारी त्यांच्या बँक खात्यात ११ लाख ३६ हजार ३२२ रुपये शिल्लक होते. दुपारी दोन वाजता दुकानावर कामात असताना फोनवर एक टेक्स्ट मेसेज आल्याचा लाहोटी यांना दिसला. आलेल्या मेसेजमध्ये केवायसी अपडेट बाबत मजकूर असल्याने त्यांनी मेसेज मधील लिंक ओपन केली. त्यानंतर त्यात दिलेले फॉर्म भरत गेले. दरम्यान त्यांच्या मोबाईल मध्ये वेगवेगळे ओटीपी क्रमांक आल्याने त्यांनी ते फॉर्ममध्ये भरणे सुरू ठेवले. हे सुरू असताना, थोड्या वेळानंतर आलेले ओटीपीचे मेसेज बारकाईने पाहिले असता वेगवेगळ्या ओटीपीद्वारे टप्प्याटप्प्याने हजारो रुपये खात्यातून निघाल्याचे लाहोटींच्या लक्षात आले. एकूण ६५६०११ रुपये निघाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर लहान भावासोबत तक्रार देण्यासाठी मेहकर पोलीस स्टेशन गाठले असता पोलिसांनी बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाण्यात जाण्याचे सांगितले. याआधी त्यांनी स्टेट बँक कस्टमर केअरला कॉलद्वारे बँक खाते बंद करण्याची विनंती केली होती. व ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात देण्यात आली असे तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.