विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारहाण!; अपमान झाल्याने युवकाने शेतात जाऊन घेतला गळफास!!; मोताळा तालुक्‍यातील घटना

 
file photo
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आणि तिच्याशी का बोलला असे म्‍हणत विवाहितेच्या पती व कुटुंबियांनी ३५ वर्षीय युवकाला बेदम मारहाण केली. यामुळे अपमान होऊन त्‍याने शेतात जाऊन गळफास घेतला. ही धक्कादायक घटना मोताळा तालुक्‍यातील पोफळी शिवारात काल, १४ जानेवारीला सकाळी समोर आली.

शेषराव श्यामराव सुरडकर (रा. पोफळी) असे आत्‍महत्‍या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्‍याचे भाऊ जानराव सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी राहुल अशोक इंगळे (३१), अनंता अशोक इंगळे (३३), अशोक ओंकार इंगळे (६०), सौ. मनीषा अनंता इंगळे (३०), सौ. अश्विनी राहुल इंगळे (२८), सौ. अनुसयाबाई अशोक इंगळे (५५, सर्व रा. पोफळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोफळी येथे शेषराव सूरडकर आई, भाऊ व वहिणीसह राहतो. त्‍यांची पोफळी शिवारात साडेतीन एकर शेती आहे. त्‍यांच्या घराजवळच राहुल इंगळे आणि त्‍याचे कुटुंबिय राहतात. शेषरावचे इंगळे कुटुंबातील विवाहितेशी एक वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते, असे जानराव यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. हे प्रेम प्रकरण राहुलला माहीत पडले. तेव्हापासून तो शेषरावला धमकावत होता. विवाहितेला माहेरी पाठविण्यात आले होते.

काही दिवसांनंतर ती परत पोफळीला आली असता शेषरावला तिच्यासोबत बोलताना राहुलने १२ जानेवारीला पाहिले. त्‍यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास राहुल इंगळे, अनंता इंगळे, अशोक इंगळे, सौ. मनीषा इंगळे, सौ.अश्विनी इंगळे, सौ. अनुसयाबाई इंगळे शेषरावकडे आले. त्यांनी शेषरावला बेदम मारहाण केली. अश्विनी व मनीषाने त्‍याला चप्पलाने मारले. तू आमच्या बायांसोबत पुन्हा बोलला तर तुला जीवे मारून टाकू, अशी धमकी त्‍याला देऊन इंगळे कुटुंब निघून गेले.

१३ जानेवारीला सकाळी पुन्हा इंगळे कुटुंबियांनी घराजवळ येऊन शेषरावला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर शेषराव घरातून निघून गेला. त्‍या दिवशी तो घरी परतला नाही. त्‍यामुळे गावात त्‍याचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. दुसऱ्या दिवशी १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता जानवराव, चुलत भाऊ ब्रह्मानंद, प्रवीण सपकाळ, भारत सुरडकर, कुणाल सुरडकर हे सर्व जण शेषरावचा शोध घेऊ लागले. तेव्हा शेताच्या बाजूला असलेल्या दिनकर सुरडकर यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला शेषरावने कपड्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तपास पोलीस उपनिरिक्षक आशिष गंद्रे करत आहेत.