बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभानल्ला! एका वर्षात २ कोटी लंपास, 'सौभाग्य' ही जातयं चोरीला ! व्यसनासाठी गुन्हेगारीत गुरफटतेय तरुणाई

जिल्ह्यात गतवर्षी २१० चोरीच्या घटना समोर आल्या. यामध्ये २ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. दरोडेखोरीच्या १४ घटना उघडकीस आल्या. यात ३९ लाख ६२ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ करण्यात आला.वाहन चोरीचा धुमाकूळ सुरू आहे. त्या पाठोपाठ मंगळसूत्र चोरही सक्रिय झालेत. चोरट्यांनी २० ते २२ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवून घेतले. पोलिसांनी काही चोरट्यांना अटक करून मुद्देमाल जप्तही केला.२०२२ वर्षात १० टक्के घटनांचा उलगडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या तरुणाईला गांजा ओढण्याच्या व्यसनाने गुरफटून टाकले.गांजा ओढण्याचे व्यसन पूर्ण करण्यासाठी घरफोडी, मोटारसायकल चोरी यांसह गुन्हेगारीच्या मार्गावर ते वळत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या युवकांना व्यसनाच्या कचाट्यातून बाहेर काढणे सध्याच्या स्थितीत एक आव्हान बनले आहे.सिगारेटच्या सवयीमुळे अनेकांना गांजा ओढण्याची सवय जडली. गांजा ओढण्याचे सर्वाधिक प्रमाण अल्पवयीन व अविवाहित युवकांचे आहे. दिवसातून २ ते ३ वेळा गांजा ओढल्यानंतर त्याचा दिवसभर नशा राहतो, तसेच हे व्यसन कमी पैशांत पूर्ण होत असल्याने आताची युवापिढी व्यसनाच्या अधीन गेली आहे. याच नशेत त्यांच्या हातून अनेक गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारीत 'बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला..'असेच काही जिल्ह्याचे चित्र असून, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी याकडे लक्ष पुरविणे अत्यावश्यक ठरत आहे.