महावितरणला कळविणे टाळले, शेतातील लाईनचे काम करण्यासाठी दोन मजुरांना बोलावले ! दुर्दैवाने दोघांचा झाला मृत्यू, चिखली तालुक्यातील मुरादपूरच्या शेतकऱ्या विरोधात गुन्हा..
Jun 15, 2024, 14:52 IST
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)शेतातील लाईनचे काम करताना दोन मजुरांचा विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना चिखली तालुक्यातील मुरादपूर येथे १३ जून रोजी घडली. दरम्यान, या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. शेतातील लाईनचे काम करण्यासाठी ज्या शेतकऱ्याने त्यांना बोलाविले. त्यानी महावितरणला कुठलीही सूचना किंवा माहिती दिली नाही. यामुळे दोघा मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी समाधान गाडेकर याच्या विरोधात करण्यात आला. महावितरणचे कनिष्ठ अभियंता आदित्य पडघान यांनी याबाबत अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून समाधान गाडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १३ जून रोजी शेतकरी समाधान गाडेकर यांच्या शेत शिवारातील विजेच्या तारा खाली लोंबकळल्या. शेतीचे कामे करताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी तातडीने लाईनचे काम करायचे ठरवले. खाजगी वायरमन बोलावून काम करवून घेण्याचे त्यांच्या मणी आले. त्यामुळे गाडेकर यांनी मेरा बुद्रुक येथील रामेश्वर उत्तमराव पडघान व वैभव रामेश्वर पडघान या दोघां बापलेकांना बोलावून घेतले. दरम्यान, लाईनचे काम करत असताना दोघांनाही विजेचा तीव्र झटका लागला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना ही वार्ता महावितरण मंडळाकडे गेली. शेतातील लाईनचे काम करायचे असल्यास समाधान गाडेकर यांनी महावितरणला आधी कळवायला हवे होते. असे महावितरण कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महावितरणला माहिती देण्याचे टाळल्याने गाडेकर यांना चांगलेच महागात पडले. काल १४ जून रोजी समाधान गाडेकर याच्या विरोधात तक्रार देण्यात आली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गाडेकर हे दोन्ही मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.