येळगाव फाट्यावर ऑटो चालकाचा राडा! एकाने दुसऱ्या ऑटो चालकाला मारला दगड ; बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
Apr 13, 2024, 12:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ऑटोत प्रवासी का बसवले या कारणावरून एका ऑटो चालकाला दुसऱ्या ऑटो चालकाने दगड मारला व त्याच्या वडिलांनी देखील शिवीगाळ केली अशी तक्रार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुरुवार, १३ एप्रिल ला देण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मतीन शाह अकबर शाह(रा.इक्बाल नगर, बुलढाणा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, मी ऑटोचालक असून गुरुवारी, बुलढाण्यातून येळगाव येथे प्रवासी घेऊन गेलो होतो. प्रवाशांना येळगाव फाट्यावर सोडल्यानंतर बुलढाण्यासाठी निघालो असता दोन प्रवासी माझ्या ऑटोत बसले. त्यांनतर येळगावच्या एका ऑटो चालकाने माझ्या ऑटोतील प्रवासी खाली उतरविले. 'प्रवासी का उतरविले' असे त्याला विचारले असता त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी त्याचे वडील देखील हजर होते. त्याच्या वडीलाला "काका मी जातो असे म्हणत मी तेथून निघालो होतो. त्यानंतर चढावरून जात असताना दोघेजण आले व ऑटोत प्रवासी का भरले या कारणावरून शिवीगाळ केली, एकाने नाकावर दगड मारला. यामुळे नाकावर दुखापत झाली असून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो होतो.दोघाबाप लेकांवर कारवाई व्हावी असे फिर्यादी मतीन शहा यांनी तक्रारीत म्हटले आहे.