१६ वर्षीय मुलीवर दोघांचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न!

नांदुरा तालुक्‍यातील धक्कादायक घटना
 
rape

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शाळेतून घरी जाणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर दोन जणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. काल, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मोमीनाबाद फाट्याजवळ (ता. नांदुरा) ही घटना घडली. पीडित मुलीने आज, १८ डिसेंबर रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडगाव (ता. नांदुरा) येथील पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती काल, १७ डिसेंबर रोजी सावरगाव नेहू (ता. नांदुरा) येथे शाळेत गेली होती. शाळा आटोपल्यानंतर ती मोमीनाबाद फाट्याजवळ उभी असताना सावरगाव येथील देवानंद शिवाजी रावणचवरे (२५) आणि अक्षय संतोष  रावणचवरे (२३) हे दोघे तिथे आले. त्यांनी मुलीला जबरदस्तीने ओढत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरड केली व त्‍यांच्याशी झटापट करून त्यांच्या तावडीतून सुटली. तिच्या आरडाओरड्याने दोघेही पळून गेले. आज सकाळी नांदुरा पोलीस ठाण्यात तिने प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी देवानंद व अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.