विवाहितेला जीवंत जाळण्याचा प्रयत्‍न!

फोन चेक करून म्‍हणायचे हे कुणाचे नंबर, तुझे बाहेर अफेअर!; खामगाव शहरातील घटना
 
महिलेचा छळ

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या सहा महिन्यांत सुखी संसाराचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर माहेरी राहत असलेल्या विवाहितेने पुन्‍हा एकदा आशेने पतीचे दार ठोठावले. यामुळे संतापलेल्या सासरच्यांनी तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्‍न केल्याची खळबळजनक घटना खामगाव शहरातील वाडी भागातील वृंदावननगरात काल, २३ नोव्‍हेंबरला सकाळी घडली. विवाहितेच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी तिच्या पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पवनसिंह रणविरसिंह राजपूत (पती), रणविरसिंह नारायणसिंह राजपूत (सासरा), सौ. सुधाबाई रणविरसिंह राजपूत (सासू) (सर्व रा. वृंदावननगर, वाडी, खामगाव), दशरथसिंह नारायणसिंह राजपूत (चुलत सासरे, रा. बुलडाणा), सौ. पूनम  निखीलसिंह तोमर (नणंद रा. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सौ. शुभांगी पवनसिंह राजपूत (२६, रा. वृंदावननगर खामगाव) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. तिचे लग्न १४ मे २०२० रोजी झाले. लग्नानंतर सासरच्यांनी काहीच दिवसांत त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. वडिलांकडून १५ लाख रुपये घेऊन ये. पवनला पुणे येथे घर विकत घ्यायचे आहे, अशी मागणी तिच्याकडे करण्यात आली. पैसे न आणल्याने तिच्या छळात वाढ झाल्याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे.

सहा महिने या परिस्‍थितीतही राहिल्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सासू, सासरे व पतीने तिचा फोन चेक करून यात कोणाचे फोन नंबर आहेत. तुझा व त्यांचा काय संबंध, असे म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन भांडण सुरू केले. विवाहितेने ही बाब माहेरी सांगितल्याने तिचा भाऊ भूपेशसिंह तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला असता तिचा पती त्‍याला म्‍हणाला, की तुझ्या बहिणीचे बाहेर अफेअर आहे. लग्नानंतर आजपर्यंत मी तुझ्या बहिणीला हातसुध्दा लावला नाही, असे म्हणून त्याच्‍यासोबत सासरच्यांनी वाद घातला. त्‍यानंतर ती माहेरी राहायला आली. विवाहितेने महिला तक्रार निवारण समितीकडेही अर्ज दिला. मात्र समेट होऊ शकला नाही. वाद मिटून समेट व्‍हावा यासाठी काल, २३ नोव्‍हेंबरला विवाहिता वडिलांच्या घरून मलकापूर येथून वाडी खामगाव येथे पतीच्या घरी आली. सकाळी ११ च्या सुमारास आल्यानंतर तिने पती व सासू-सासऱ्यांना "असे किती दिवस चालणार? काहीतरी आपसात बोलून भांडणाचा समेट करा' असा प्रश्न केला. त्‍यावर आम्हाला तुझ्यासोबत बोलायचे नाही. तू येथे का आली, असे म्हणून सासरच्यांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली.  पतीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. एका खोलीत तिला बंद केले. खिडकीच्या बाहेरून पतीने आगपेटीची जळती काडी तिच्या अंगावर फेकली. तेव्हा बाजूला सरकल्याने ती वाचली. तिने आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आवाज एेकून खोलीचा दरवाजा उघडला. त्यानंतर ती कशीबशी बाहेर आली, असे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे. वाडी येथून तिने ऑटोने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी पती, सासू, सासरे, चुलत सासरे, नणंदेविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

विवाहितेच्या सासरकडूनही तक्रार...
याच प्रकरणात विवाहितेच्या सासरकडूनही खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक दरबारसिंह नारायणसिंह राजपूत (६२, रा. वाडी खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवाहिता शुभांगीसह तिचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हरपालसिंह श्यामसिंह राजपूत (५७, रा. मलकापूर), भाऊ भूपेश (३०), आई कमलाबाई (५६, सर्व रा. मलकापूर) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. दरबारसिंह राजपूत यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की दिवाणी केस मागे घ्या असे म्‍हणून हरपालसिंह, भूपेश, कमलाबाई, शुभांगी दरवाजाला लाथा मारून घरात घुसले. त्‍यांनी घरातील सामानाची फेकझोक करून त्‍यांना व त्‍यांच्या पत्‍नीला मारहाण केली. तुमचे कपडे काढून नंगे करतो. हातपाय तोडून ट्रक खाली टाकू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास सहायक फौजदार विजय मिरगे करत आहेत.