लग्नाच्या वरातीत वऱ्हाडी मंडळीला सगळं सोडून पळाव लागलं! बुलडाणा शहरातील प्रकार, नेमक झालं काय ते बातमीत वाचा..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लग्नाची वरात निघाली, डीजेच्या आवाजावर सगळी वऱ्हाड मंडळी थिरकत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता पण तितक्यातच असं काही घडलं की सगळ्या वऱ्हाड मंडळीला वरातीतून पळाव लागल..हा सगळा अचंबित करणारा प्रकार घडला तो काल रविवार रात्री बुलढाणा शहरातील जांभरुण रोड परिसरात.
 तर झालं असं की, शहरातील जांभरुण रोड परिसरात, एक लग्न सोहळा संपन्न होत होता. दरम्यान ज्या ठिकाणाहून वरात निघालेली होती तिथे एका झाडावर मधमाशांच अगडबंब पोळ जमलेल होत. इकडे वरातीत डीजेचा आवाज अन् आवाजाच्या तालावर वऱ्हाडी नाचत होते. पण डीजेच्या आवाजामुळे झालेल्या (vibration) कंपनामुळे मधमाशांचे पोळ उटले आणि या मधमाशांनी वऱ्हाडी मंडळींवरच हल्लाबोल केला. त्यामुळे एका मिनिटातच नाचत असलेल्या मंडळीच्या आनंदाचे वेदनेत रुपांतर झाले. सगळी मंडळी सैरावैरा करत पळत सुटली, अनेकजण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेत. यामुळे लग्न सोडून अनेकांना दवाखाना गाठावा लागला. दरम्यान, या वर्दळीत नवरदेव सुरक्षित असल्याने विघ्न टळले. आणि या मांगल्याचा क्षणी शेवटी शुभमंगल झालं.. सध्या जखमी वऱ्हाडींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जखमींची संख्या दहा आहे.