दोन भावांचा "तो' धंदा एएसपींच्या पथकाने उधळला; शेगावच्या प्रीतम ट्रेडर्सवर छापा

 
गुटखा
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध लावूनही अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या दोन सख्ख्या भावंडांना अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. काल, १३ जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास शेगाव शहरात ही कारवाई करण्यात आली.अटक केलेल्या आरोपींकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील लखपती गल्लीत प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने पथकाने शेगाव शहरातील अग्रसेन चौकातील प्रीतम ट्रेडर्स या दुकानावर छापेमारी केली. दुकानात सौरभ कमलकिशोर टिबडेवाल हा गुटखा विक्री करताना दिसून आला.

दुकानातून पोलिसांनी राज वेगवेगळ्या कंपनीचा  प्रतिबंधित गुटखा व मोबाईल असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आणखी माल कुठे ठेवलाय, अशी विचारणा केल्यावर घरी ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लखपती गल्लीतील राहत्या घरावर छपा मारला घरी सौरभचा मोठा भाऊ प्रीतम याच्या ताब्यातून ८५ हजार रुपयांचा गुटखा, वन प्लस मोबाईल  असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घरातील आणि दुकानातील मिळून पोलिसांनी १ लाख ५० हजार४३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुटखा विक्री करणारे दोन्ही भाऊ सौरभ टिबडेवाल व प्रीतम टिबडेवाल यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.