काल काही मुलांशी वाद झाला, आज अपहरण!

१५ वर्षीय मुलगा शाळेत पोहोचलाच नाही!, चिखली तालुक्यातील घटना
 
File Photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १५ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना आज, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी नायगाव (ता. चिखली) येथे समोर आली. प्रणव राजेंद्र जवंजाळ असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
प्रणवचे वडील राजेंद्र जवंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव दहावीत शिकतो. तो साखरखेर्ड्यातील अनिकेत सैनिक स्‍कूलमध्ये शिकतो. आज सकाळी तो शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मात्र शाळेत पोहोचलाच नसल्याचा फोन शाळेतून प्रणवच्या वडिलांना आला. दिवसभर सगळीकडे प्रणवच्या वडिलांनी व नातेवाइकांनी त्‍याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. काल प्रणवचा शाळेत काही मुलांसोबत वाद झाला होता. आज त्याचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले, असा संशय प्रणवच्या वडिलांना आहे. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.