चिखली - साकेगाव रस्त्यावर झालेल्या "त्या" अपघातातील आणखी एका तरुणाचा मृत्यू ! साकेगावच्या पप्पु राजपुतची मृत्यूशी झूंज अपयशी!

 
Yyj
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली - साकेगाव रस्त्यावर २९ जानेवारीच्या मध्यरात्री रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला  स्विफ्ट कार धडकल्याने झालेल्या अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले होते. आज,१० फेब्रुवारीला त्या अपघातात जखमी झालेल्या साकेगाव येथील पप्पू राजपूत या तरुणाचा मृत्यू झाल्याने अपघातातील मृतकांची संख्या तीन झाली आहे.

 सुनील किसनराव देव्हडे (३३) हर्षद पांडे(३०) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर यश वाधवाणी, आकाश चिंचोले( दोघे रा.चिखली) आणि पप्पू राजपूत( रा.साकेगाव, ता.चिखली) हे तिघे  अपघातात गंभीर जखमी  झाले होते. साकेगावच्या पप्पू राजपूत ला घरी सोडण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने पाचही जण साकेगावला सोडायला जात होते.

वाघापूरजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली असलेल्या पळसाच्या झाडावर आदळली, अपघाताने पळसाचे झाडही जमिनीतून मुळासकट उखडले. या भीषण अपघातात सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर यश वाधवाणी, आकाश चिंचोले, पप्पू राजपूत तिघेही गंभीर जखमी झाले होते. तिघा जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पप्पू राजपूतची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.