संतापजनक ; राजूर घाटात बसमध्ये वासनांध प्रवाशाचे कंडक्टर महिलेसोबत दुष्कृत्य! चालकाने थेट ठाण्यात बस आणली, अन् पोलिसांनी धो धो धुतले..
Updated: May 19, 2024, 13:39 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरानजीक असलेला राजूर घाट.. अनेकदा विविध घटनांनी चर्चेत आला आहे. त्यातच पुन्हा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका वासनांध बेवड्या प्रवाशाने महिला कंडक्टरला अश्लील शिवीगाळ करत चक्क गळा दाबून वाईट उद्देशाने विनयभंग केल्याची घटना काल १८ मे रोजी सायंकाळी घडली. प्रवाशाचे दुष्कृत्य पाहून बस चालकाने बस थेट शहर ठाण्यात आणून त्या प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन केले. एवढेच नाही तर त्या प्रवाश्यांने पोलीस ठाण्यात देखील गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी त्याला चांगलेच बदडले, अशी माहिती मिळतेय.
याबाबत ३८ वर्षीय महिला कंडक्टरने बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काल मलकापूर येथून बुलढाण्याकडे एमएच ०६ एस ८०४६ क्रमांकाच्या परिवहन महामंडळाच्या बसवर कर्तव्यावर असताना मोताळा येथून मद्यपान केलेला संदीप ईश्वर पाटील रा. आवेजरखेडा, ता.भुसावळ जि.जळगाव, हा बस मध्ये चढला व आरडाओरडा करू लागला, त्याने पिडीत महिलेला अश्लील शिवीगाळ केली, गळा दाबून लोटल्याने त्या बसच्या सीटवर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. इतकेच नाही तर, वाईट उद्देशाने हात पकडून गळा पकडला. हा राडा झाल्यानंतर चालकाने बस थेट बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आणली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत बोराखेडी पोलिसांना पाचारण करून बसमध्ये धिंगाणा घालणाऱ्याला सुपूर्द केले.आरोपी संदीप ईश्वर पाटील याच्या विरोधात बोराखेडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा,विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.