सुंदरखेडच्या जाधवांची फसवणूक करणाऱ्या अनिल ठाकूरला वडनगरातून उचलले!सायबर पोलिसांची दमदार कामगिरी..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गुजरात राज्यातील वडनगर येथे बुलढाणा सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल १० लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला उचलून आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. एकेकाळी झारखंड राज्यातील 'जामताडा' हे गांव सायबर गुन्ह्यासाठी कुप्रसिद्ध होते. परंतु आता ऑनलाइन फसवणुकीमध्येही देशातील इतर मोठ्या शहरांची नावे जुडत असल्याचे गंभीर चित्र आहे. गुजरात राज्यातील 'वडनगर' हे त्यापैकीच एक आहे.
 बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड येथील रहिवासी अभिजीत अनिल जाधव (३९ वर्ष) यांनी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी बुलडाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांची दहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केल्या गेला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. तांत्रिक शोध घेतला. यामध्ये आरोपीचे लोकेशन हे गुजरात राज्यातील, मैसाना जिल्ह्यातील वडनगर असल्याचे समोर आले. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा सायबर पोलीस स्टेशन प्रमुख प्रकाश सदगीर, पोलीस कर्मचारी शकील खान,रामू मुंडे, राजदीप वानखेडे, क्षितिज तायडे, 
विक्की खरात यांचे पथक गुजरातच्या दिशेने रवाना झाले. वडनगर येथे पोहोचून आरोपी अनिल अर्जुनजी ठाकूर याचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले. आज १३ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आरोपीला बुलडाण्यात आणण्यात आले .या आरोपीवर बुलढाण्यातच नाही तर, वडनगर तसेच हैदराबाद येथे देखील सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली . 
बुलढाणा सायबर पोलीस खाली हात परतले असते! पण..
दरम्यान, बुलडाणा सायबर पोलिसांचे पथक वडनगर येथे पोहोचले असता स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा छडा लावण्यात आला. त्याला पकडून पोलीस ठाण्यात पोलिसांनी आणले. ठाण्यात आल्यानंतर वडनगरच्या ठाणेदाराने आरोपीला बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता. आम्ही आमच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करत असल्याचे बुलढाणा सायबर पोलिस समजावत होते. यांनतर जवळपास आठशे किलोमीटर लांब जाऊन बुलडाणा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सुद्धा रिकाम्या हाती कसे परतायचे ? असा गंभीर सवाल उपस्थित झाला होता. यामुळे सायबरचे ठाणेदार प्रकाश दातीर यांनी सर्व माहिती बुलडाणा एसपी सुनील कडासने यांना दिली. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी तात्काळ म्हैसाना येथील एसपीला कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यांनतर तिथल्या एसपीने आरोपीला बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले.