अन् गिरीश महाजन झाले बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री.. ​​​​​​​

 
girish mahajan
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरय हे का हे? गिरीश महाजन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत का? तर तस...कागदोपत्री नाही..! मात्र जी भूमिका पालकमंत्र्यांनी बजावायला पाहिजेत..त्या भूमिकेत आज नामदार गिरीश महाजन दिसलेत..! जिल्ह्याचे खरे पालकमंत्री गुलाबराव पाटील नेहमीप्रमाणे आले अन् निघूनही गेले मात्र समृध्दीवर झालेल्या त्या भयावह अपघातानंतर घटनास्थळी सगळ्यात आधी पोहचलेले मंत्री गिरीश महाजन अजूनही जिल्हा मुख्यालयात ठाण मांडून आहेत. स्वकियांच्या मृत्यूने आक्रोश करणाऱ्या नातेवाईकांशी चर्चा करण्यापासून तर मृतांच्या नातेवाईकांच्या राहण्याची,जेवण्याची व्यवस्था..नातेवाईकांना बुलडाण्यात आणण्याची व्यवस्था या सगळ्यावर ते लक्ष ठेवून आहेत बुलडाणा जिल्हा रुग्णालयातून..! त्यामुळे जिल्हा रुग्णालयात सकाळपासून वार्तांकन  करणाऱ्या पत्रकारांना, अधिकाऱ्यांना गिरीश महाजन यांच्यात दिसले ते खरेखुरे पालकमंत्री..! 
 

मुंबईवरून सकाळी ७ वाजता गिरीश महाजन जामनेर येथील त्यांच्या घरी पोहचले. टिव्हीवर अपघाताची बातमी पहिली अन् विलंब न करता बुलडाण्यासाठी निघाले. सकाळी ९ वाजता ते देऊळगावराजा येथील रुग्णालयात पोहचले, तिथून समृध्दीवर झालेल्या अपघातस्थळी पोहचले. अपघातस्थळी पोहचणारे ते पहिले मंत्री होते. दरम्यान ते पुन्हा बुलडाण्यात आले. जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची पाहणी केली. तिथे येत असलेल्या मृतकांच्या नातेवाईकांशी ते दुपारपासून चर्चा करीत आहेत.

 मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने कोणता मृतदेह कुणाचा याची ओळख पटणे कठीण आहे. अशा परिस्थितीत मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह द्यायचा कसा असा प्रश्न दुपारी उपस्थित झाला होता.गिरीश महाजन  यांनी फॉरेन्सिक लॅबच्या टिमशी चर्चा केली. महाराष्ट्रातील सगळ्या मशीन एकत्र केल्या आणि सलग २४ तास काम केले तरी कोणता मृतदेह कुणाचा हे कळायला कमीत कमी ५ दिवस लागतील असे त्यांना फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देतांना काय अडचणी येत आहेत हे महाजन यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्कार विधिवत झाले पाहिजेत तशी तयारी करण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मृतकांचे नातेवाईक बुलडाण्यात लवकरात लवकर पोहचले तर अंत्यसंस्काराचा निर्णय घ्यायला सोईचे होईल, म्हणून गिरीश महाजन यांनी त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. मृतकांच्या नातेवाईकांना बुलडाण्यात आणण्यासाठी तिथल्या तिथल्या जिल्हाधिकारी, एसपी, तहसीलदारांना स्वतः महाजन यांनी फोन करून प्रशासनाची गाडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. चिखलीच्या आमदार श्र्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड,  जिल्हाधिकारी एच.पी तूम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी हे देखील गिरीश महाजन यांच्या दिमतीला आहेत. सकाळपासून कुण्याही अधिकाऱ्याने अन्नाचा कण देखील घेतलेला नाही. 

 पोलिसांच्या गाडीचा माईक महाजनांच्या हातात..!

 २५ मृतकांचे नातेवाईक बुलडाण्यात पोहचले आहेत. त्या नातेवाईकांची योग्य ती व्यवस्था झाली पाहिजेत यासाठी महाजन यांनी दोन हॉटेल बुक करायला सांगितल्या. तिथे नातेवाईकांना आज रात्री थांबता येईल. जिल्हा रुग्णालय परिसरात प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सूचना देण्यासाठी स्वतः महाजन यांनी पोलिसांच्या गाडीचा माईक हाती घेतला. नातेवाईकांची व्यवस्था  कुठे केली आहे, त्यासाठी आवश्यक फोन नंबर गिरीश महाजन यांनी स्वतः माईकवरून सांगितले. वृत्त लिहीत असताना सुद्धा मंत्री गिरीश महाजन जिल्हा रुग्णालयात आहेत. त्यांच्यासोबत चिखलीच्या आमदार श्वेताताई आहेत. दुसरीकडे जिल्ह्याचे खरेखुरे पालकमंत्री जिल्ह्यात फेरफटका मारून दुपारपासून जळगावात असल्याचे कळते..!