ॲम्बुलन्स डायरेक्ट पोलीस ठाण्यात! पोलीसही चक्रावले, बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात नेमकं झालं तरी काय...?

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अपघातात गंभीर जखमी झाल्यावर उपचारा दरम्यान दगावल्यावर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह रुग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात आणली. जोपर्यंत आरोपी चालकास अटक करत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्यावर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले. त्यानंतर हे सोयरे मंडळी शांत झाले आणि अंत्यसंस्कार साठी रवाना झाले... 
बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हा थरारक व पोलिसांची सत्त्वपरीक्षा पाहणारा घटनाक्रम घडला. याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे.
बुलडाणा ते देऊळघाट या दरम्यान एका दुचाकी स्वाराला एका ऑटो रिक्षाने धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या जाबिर बशीर पटेल (३३, राहणार देऊळघाट, ता बुलडाणा) याच्यावर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज बुधवारी त्याचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूस कारणीभूत ऑटो चालक फरार होता.
  त्यामुळे संतप्त मृतकच्या नातेवाईकानी संभाजीनगर येथून मृतदेहासह रुग्णवाहिका सरळ बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आणली! त्यामुळे पोलीस कर्मचारीही हादरले. पोलिसांची धावाधावं सुरु झाली. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून चालकाला पकडले. तेव्हाच मृतकाच्या नातेवाईकांचा राग शांत झाला. मृतदेह ताब्यात घेऊन ते अंत्यसंस्कारा साठी देऊळघाटला रवाना झाले.