गुवाहाटीच्या संचालकाकडून खामगावच्या अक्षयची फसवणूक! ३ लखांना लागला चुना; म्हणून पोलीस म्हणतात हुशारीने वागा...

 
money

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राधाकृष्ण सेल्स प्रा.लि.गुवाहाटी आसामच्या संचालकने खामगाव तालुक्यातील एका तरुणाची ३ लाखाने फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

अक्षय संजय जाधव (वय वर्ष -२६ रा.हिंगणा कारेगाव, ता.खामगाव) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय जाधव याची गावातच आदर्श ट्रेडिंग एजन्सी आहे.या एजन्सी मध्ये तो सुपारी कटिंग चा व्यवसाय करतो. अक्षय याने राधाकृष्ण सेल्स प्रा. लि. गुवाहाटी आसामचा संचालक हरीश गुलाटी यांच्यासोबत (२ हजार कि.ग्रा) सुपारी किंमत ६ लाख ९ हजार रुपये खरेदीचा सौदा ६ सप्टेंबर २०२२ रोजी केला होता. यामध्ये ५०% रक्कम आधी पाठवायचे ठरले होते, म्हणून अक्षयने (३ लाख ४ हजार ५०० रुपये) ऑनलाईन हरीश गुलाटी याला पाठवले. ५०% ठरल्याप्रमाणे आधी पैसे देऊनही हरीष गुलाटी याने सुपारी पाठविली नाही. अक्षयने गुलाटी याला वेळोवेळी  सुपारीची मागणी केली होती. यावेळी गुलाटी याने उडवीची उत्तरे देऊन ठरल्याप्रमाणे सुपारी पाठवले नाही. उलट ट्रान्सपोर्टर शंकर चटर्जी (रा.अलिपुराद्वारा पश्चिम बंगाल) याचा मोबाईल नंबर देऊन संपर्क करा असे सांगितले होते. 

परंतु ट्रान्सपोर्टरने सुद्धा उडवा उडवीची उत्तरे दिले. आपली फसवणूक झाली असल्याचे अक्षय जाधव याच्या लक्षात आल्यानंतर २२ जून रोजी २०२३ रोजी अक्षयने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन तशी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अक्षय जाधव यांच्या तक्रारीवरून  हरिष गुलाटी,ट्रान्सपोर्टर शंकर चॅटर्जी याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोहेकॉ  शिवाजी दळवी करीत आहेत.