पतीच्या निधनानंतर जुन्या प्रियकरासोबत थाटला संसार!; दोघांना मूल झाल्यावर तो म्‍हणाला, तुझी जात वेगळी, माझी वेगळी..!!; खामगावात प्रियकराविरुद्ध गुन्हा

 
rape
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नानंतर ती संसारात रमली होती... तिला दोन मुलीसुद्धा झाल्या... त्यातील एकीचे वय सध्या १४ तर दुसरी १० वर्षांची. मात्र ४ वर्षांपूर्वी अपघातात तिच्या नवऱ्याचे निधन झाले. त्यानंतर ती पुन्हा तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्न केले. अर्थात हे लग्न पार पडले ते एका खोलीत दोन- चार जणांच्या उपस्थितीत. त्यानंतर प्रियकरापासून तिला मुलगा झाला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. मुलगा कशाला होऊ दिला, मी त्याला वागवणार नाही... तुझी जात वेगळी माझी वेगळी असे म्हणत तिला वागवायला नकार दिला. त्यामुळे काल, ७ जानेवारी रोजी तिने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून संतोष येवले (रा. शेलोडी, ता. चिखली) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कविता संतोष येवले (३५, रा. साईनगर, वाडी, खामगाव) हिने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार कविताच्या मामाचे गाव शेलोडी (ता. चिखली) आहे. लग्नाआधी ती मामाच्या गावाला येत होती. तेव्हा संतोष येवले याच्यासोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र कविता दुसऱ्या जातीची असल्याने दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यानंतर कविताचे लग्न शेगाव तालुक्यातील गायगाव येथील मोहन श्रीराम सोनवणे यांच्यासोबत झाले. कविताला मोहन यांच्यापासून दोन मुली झाल्या.

सर्व काही सुरळीत सुरू असताना ४ वर्षांपूर्वी मोहन यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये कविता मामाच्या गावाला शेलोडी येथे गेली, तेव्हा जुना प्रियकर संतोष तिला भेटला. त्यांचे पुन्हा प्रेमसंबंध जुळले. तुझ्यासोबत लग्न करतो, तुझ्या मुलींचा सांभाळ करतो, असे आश्वासन संतोषने कविताला दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. कविताला पतीचा अपघात विमा मिळावा म्हणून संतोषने कविताला मदत केली.

तेव्हा संतोष कविताला भेटायला गायगाव (ता. शेगाव) येथे तिच्या आधीच्या नवऱ्याच्या घरी येऊ लागला. मात्र गावातील लोकांनी विरोध केल्याने एप्रिल २०२० मध्ये कविताला संतोषने भाड्याची खोली घेऊन दिली. त्याच खोलीत कवितासोबत संतोषने लग्न केले, तेव्हा कविताची बहीण, घर मालकीण, संतोषचे दोन मित्र उपस्थित होते. लग्नाचे मोबाइलमध्ये फोटोसुद्धा काढलेले असल्याचे कविताने तक्रारीत म्हटले. संतोष येवलेपासून कविताला एक मुलगा झाला. तो सध्या ३ महिन्यांचा आहे. मात्र मुलगा झाल्यापासून संतोष हा कविताशी भांडत आहे. तुला सांगितले होते. मुलगा होऊ देऊ नको.

माझी बदनामी करू नको. तुझी जात वेगळी माझी वेगळी. मला ते मूल चालत नाही, असे म्हणत संतोष हा कविताला मारहाण करू लागला. मी भाड्याच्या खोलीत किती दिवस राहू, अशी विचारणा कविताने केली असता मी तुला गावात नेऊ शकत नाही. तुला इथेच रहावे लागेल. गावात नेले तर माझी बदनामी होईल, असे संतोष कविताला म्हणत होता. यावर मी शेलोडी येथे राहायला येते, असे कविताने म्हटले असता तू जर शेलोडीला आली तर हात पाय तोडून टाकेन, अशी धमकी संतोषने दिली. संतोष येवले याच्या पहिल्या पत्नीने देखील फोन करून "तू कुठं माझ्या नवऱ्याची बायको आहे. तू तर त्यांची ठेवलेली आहे' असे म्हणत तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचेही कविताने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी संतोष बळीराम येवले (४०, रा. शेलोडी, ता. चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.