४८ तासानंतर समाधान सरकटेंचा मृतदेहच सापडला! पुरात गेले होते वाहून; ६ लेकी बापाच्या प्रेमाला मुकल्या.. ​​​​​​​

 
dfgh

लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ४ जुलैला लोणार तालुक्यातील शिवणी जाट गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. या पुरात तिघे शेतकरी बैलगाडीसह वाहून गेले होते. त्यापैकी २ शेतकऱ्यांच्या हाताला झाडाच्या मुळ्या लागल्याने ते वाचले होते, मात्र समाधान सरकटे हे ४८ वर्षीय शेतकरी गायब होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या शोध व बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू होता. घटनेच्या तिसरी दिवशी आज,६ जुलैला समाधान सरकटे यांचा मृतदेहच हाती लागला आहे.

समाधान सरकटे घटनेच्या दिवशी मजुरी कामासाठी गेले होते. परत येताना बैलाचा पुलावरून  पाय घसरल्याने पुराने वाहत असलेल्या ओढ्यात बैलगाडी पडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या हाताला झाडाच्या मुळ्या लागल्याने ते वाचले होते, मात्र  समाधान सरकटे सापडत नव्हते. या अपघातात बैलगाडीचा बैल देखील दगावला होता. घटनेच्या दिवसापासून जिल्हा व तहसील प्रशासनाकडून समाधान सरकटे यांचा शोध सुरू होता, मात्र सातत्याने येणारा पाऊस शोधकार्यात अडथळा ठरत होता.

 दरम्यान आज घटनेच्या तिसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समाधान सरकटे यांचा मृतदेह धरणातील पाण्यावर आला. सरकटे यांचा मृतदेह गाळात फसलेला होता. शोध पथकाने पाणी धरणात ठिकठिकाणी पाणी ढवळून काढल्याने चिखलात रुतलेला मृतदेह निसटून पाण्यावर आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून आज रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 ६ लेकी बापाच्या प्रेमाला मुकल्या..!

समाधान सरकटे यांचा प्रचंड मेहनतीचा स्वभाव होता. सरकटे यांना ६ मुली असून मुलगा नाही. त्यापैकी तिघींचे लग्न झाले असून तिघी शिकत आहेत. मिळेल ते काम करून त्यांनी मुलींना शिकवले,संसाराला लावले.मात्र आता बापाच्या प्रेमाला लेकी मुकल्या आहेत.