जिल्ह्यातल्या दोन खादाडांना "एसीबी" चा दणका; लाचखोरी करतांना रंगेहाथ पकडले;
धाड पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल राजेश मानकरला ५ हजार रुपये खायचे होते; सिंदखेड राजाचा भूमी अभिलेख कार्यालयातला उपाधीक्षकही लाचखोर निघाला

चांडोळ येथील एका दाम्पत्यावर धाड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. त्यातील पत्नीचे नाव वगळावे या हेतूने पतीने बीट जमादार राजेश मानकर याला विनंती केली होती. त्यावेळी गुन्ह्यातून नाव वगळायचे असेल तर ५ हजार रुपये लागतील असे लाचखोर मानकर ने संबधितास सांगितले होते. मात्र लाच द्यायची नसल्याने संबधित व्यक्तीने एसीबी कडे त्याची तक्रार केली. एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मानकर लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. आज, १२ मेच्या सायंकाळी चांडोळ च्या पोलीस चौकीजवळ साध्या वेशात दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने मानकर याने लाच स्वीकारताच त्याच्यावर झडप घातली. त्याच्याविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे.
दुसऱ्या घटनेत सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक जितेंद्र देहरे याला ५ हजारांची लाच घेतांना पकडण्यात आले. तक्रारदाराच्या वडिलांच्या वारसांची नोंद करण्यासाठी लाचखोर देहरे याने ५ हजारांची लाच मागितली होती. संबंधितांनी त्याची तक्रार एसीबी कडे केली. पडताळणी नंतर साफळा कारवाईत लाचखोर देहरे अलगद अडकला.