आठवीतील मुलीचे अपहरण; जळगाव जामोद तालुक्यातील घटना

 
जिल्ह्यातून महिनाभरात ११ अल्पवयीन मुलींचे अपहरण; आजही शेगावमधील १५ वर्षीय मुलगी गायब!
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आठवीत शिकणाऱ्या साडेतेरा वर्षीय मुलीचे गावातीलच तरुणाने अपहरण केले. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथे २ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी काल, १० जानेवारीला मुलीच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अपहरण करणाऱ्या दिनेश मोहन चौहान (२०) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथील साडेतेरा वर्षांची मुलगी हनवतखेड (ता. जळगाव जामोद) येथील आश्रमशाळेत आठवीत शिकते. मात्र सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ती घरीच घरच्या कामात मदत करत होती. ती २ जानेवारीला शेतात गुरे चारायला घेऊन गेली होती. मात्र संध्याकाळी गुरे घरी परतली. मात्र मुलगी परतली नाही. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

दरम्यान गावातील लोकांनी तुमची मुलगी गावातीलच दिनेश घेऊन गेला असल्याचे तिच्या वडिलांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी दिनेशच्या घरी जाऊन पाहिले असता दिनेश पळून गेल्याचे दिनेशच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर जवळपास आठवडाभर दोघांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने काल, १० जानेवारी रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून दिनेश विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.