समृध्दीवर भीषण अपघात! इर्टिका आणि स्विफ्ट कार एकमेकांना धडकली; ७ जणांचा जागीच मृत्यू; नियम मोडणे जीवावर बेतले; ठार झालेले चौघे देऊळगावराजा तालुक्यातील...
Updated: Jun 29, 2024, 11:16 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृध्दी महामार्गावर जालना जिल्ह्याच्या हद्दीत २८ जूनच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. नागपूरवरून मुंबईकडे जाणारी इर्टिका आणि डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक झाली..या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत.अपघातात ठार झालेल्यांपैकी तिघे देऊळगावराजा तालुक्यातील राहणारे आहेत.
Advt 👆
Advt 👆
प्राप्त माहितीनुसार एम एच ४७ बि पी ५४७८ क्रमांकाची इर्टिका कार नागपूर वरून मुंबईकडे जात होती. रात्री अकराच्या सुमारास एम एच १२, एम एफ १८५६ क्रमांकाची स्विफ्ट कार कडवंची गावाजवळील पेट्रोल पंपावरून डिझेल भरून विरुद्ध डिझेल भरून विरुद्ध दिशेने येत होती. विरुद्ध दिशेने अचानक कार आल्याने इर्टिका आणि स्विफ्ट ची जोराची धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. दोन्ही वाहने बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघांचा आणि इर्टिका वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहेत, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नियम मोडला आणि घात झाला...
समृद्धी महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहने येत नाहीत. नागपूरकडे जाण्यासाठी आणि मुंबईकडे जाण्यासाठी दोन वेगवेगळ्या लेन आहेत. मात्र पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी स्विफ्ट कार दुसऱ्या लेन वर गेली . तिथून परत येताना मुंबई कडे जाणाऱ्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने धावली, त्यामुळेच हा अपघात झाला. स्विफ्ट कारचालकाची चुकी ७ जणांच्या जीवावर बेतली..
बुलडाणा जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू...
या अपघात स्विफ्ट डिझायर मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. चौघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील आहेत. विलास कायंदे (२८, उंबरखेड), संदीप बुधवंत (२८,उंबरखेड), प्रदीप मिसाळ(३०, पिंपळगाव बुद्रूक) आणि अनिकेत चव्हाण (३०, देऊळगावराजा) अशी मृतकांची नावे आहेत. चौघेही काल फिरायला जात असल्याने सांगून घरून निघाल्याचे सांगण्यात येत आहे.