एलसीबीची दमदार कामगिरी! ५ अट्टल चोरट्यांना केले जेरबंद! लई मोठा माल पकडला..

 
Bbbv
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुन्हेगारांच्या टोळीतील चौघांना अटक केली. तसेच वर्षभरापूर्वी घडलेल्या दुचाकीचोरीतील एका आरोपीसदेखील पोलिसांनी गजाआड केले. दोन्ही कारवायांमिळून एक स्विफ्ट डिझायर कार, पिकअप वाहन, चार दुचाकी, मोबाइल आणि रोख रकमेसह १० लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात घडलेल्या जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी गुन्ह्यांचा तपास करण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी विविध पथके स्थापन केली आणि गुन्ह्यांचा समांतर तपास करून यश मिळविले.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात येणाऱ्या सावरखेडा येथील सिद्धेश्वर कडुबा राऊत हे देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गाने टाटा ४०७ वाहना (क्रमांक एमएच-४३-एडी-७५९९) मध्ये माल घेऊन ६ जुलै रोजी निघाले होते. जालना येथून जाफराबादकडे जाताना चार आरोपींनी स्विफ्ट डिझायर वाहन आडवे लावून राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांना अडविले. लोखंडी रॉडने दोघांना मारहाण करत त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, मोबाइल व अन्य साहित्य असा ५० हजारांचा ऐवज लुटण्यात आला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या विविध पथकांनी कसून तपास केला असता आरोपींची कुंडली मिळाली. जालना जिल्ह्यातील चार आरोपींना १३ जुलै रोजी अटक करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांत आणखी आरोपींचा सहभाग असून, त्या फरारींचा शोध घेण्यासाठी पथके विविध मार्गांनी तपासात रवाना झाले आहेत.
एलसीबी पीआय अशोक लांडे, एपीआय आशिष चेचरे, पीएसआय सचिन कानडे, रवी मोरे, पोहेकॉ शरद गिरी, दिगंबर कपाटे, राजेंद्र अंभोरे, पुरुषोत्तम आघाव, नाईक पोलीस शिपाई गणेश पाटील, अनंत फरताळे, पोलीस शिपाई अमोल शेजोळ, विजय सोनोने, जयंत बोचे, विक्रांत इंगळे, सुनील मिसाळ, चालक सुरेश भिसे, विलास भोसले, त्याचप्रमाणे तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ राजू आडवे, पोलीस शिपाई ऋषी खंडेराव यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कसून तपास केला.
जबरी चोरीतील आरोपींची नावे
संदीप बंडूराव गंगावणे (३२, चांदई एको. ह.मु. हिंदनगर, जालना), युसूफ शेख अब्दुल करीम (२७, हिंदनगर, नवीन मोंढा, जालना), हर्षल शिरीष अग्रवाल (२३, भाजीमंडी, गोल मशिदीजवळ जालना), सुरेश अशोक मोरे (लालबाग, देऊळगाव राजा रोड, जालना).
वर्षभरापूर्वीची दुचाकीचोरी उघड
दुसरी दुचाकीचोरीची घटना डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मेहकर तालुक्यातील डोणगावचे रहिवासी शंकर विष्णू पवार यांची एमएच-२८-बीडी-१८९० क्रमांकाची दुचाकी डोणगावातील मंगल कार्यालयासमोरून १ जून २०२३ रोजी चोरीस गेली होती. या चोरीचा गुन्हादेखील एलसीबीने उघडकीस आणला. संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (२८, पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि. वाशीम, ह.मु. चाळीस फुटी आळंदी, पुणे) यास १३ जुलै २०२४ रोजी पुण्यातून अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.