मलकापूरात अंगावर काटे आणणारा अपघात ; अज्ञात वाहनाने पादचारी पोलीस पाटलांना हवेत उडवले फुटबॉलसारखे.. पोलीस पाटील ठार ! बातमीत बघा व्हिडिओ

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर शहर परिसरात काल 'हिट अँड रन' अपघाताची घटना घडली. परप्रांतातील भरधाव वाहनाने पायी जाणाऱ्या इसमाला उडविल्याने एका इसमाचा करुण अंत झाला. या अपघाताचा अंगावर काटे आणणारा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हाॅटेल यादगार नजीक काल सोमवारी ही भीषण दुर्घटना घडली.
    भरधाव चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्यावर अपघातग्रस्त वृद्ध इसम अक्षरशः फुटबॉल सारखा हवेत भिरकावला गेल्याचे 'सीसीटीव्ही फुटेज' मध्ये दिसून येत आहे. धडक देणारी 'कार' गुजरात राज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अपघात नंतर काही वेळ थांबलेली कारने लगेच घटनास्थळावरून काढता पाय केल्याचे दिसून आले. 
भरघाव चारचाकीच्या धडकेत डोक्यात गंभीर मार लागल्याने सदर व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
नामदेव तुकाराम कवळे (वय ५८) असे मृताचे नाव असून ते मलकापूर तालुक्यातील कुंड बुद्रुक येथील रहिवासी आणि गावाचे पोलिस पाटील असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले.
तालुक्यातील कुंड बुद्रुक येथील रहिवासी तथा पोलिस पाटील नामदेव तुकाराम कवळे (५८) हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हाॅटेल यादगा रनजीक वाहन पकडण्यासाठी ते पायी जात होते. त्यावेळी मुंबई वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव (जीजे-१५, बिएफ-२५६४) चारचाकी वाहनाने कवळे यांना वेगाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते हवेत अक्षरशः भिरकावल्या जाऊन दूर अंतरावर जाऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
खाली उतरले पण...
अपघात घडल्यानंतर 'त्या' चारचाकीतून प्रवास करणारे खाली उतरले. त्यांनी कवळे यांना अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेले पाहिले.त्यामुळे पोलीस कारवाईच्या भितीने घटनास्थळी न थांबता त्यांनी पुन्हा गाडीत बसून घटनास्थळ वरून पलायन केले . त्यांची ही अमानुष आणि असंवेदनशील कृती देखील राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान परिसरातील व्यावसायिक, पादचारी आणि समाजसेविनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी त्यांना तपासले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. जमलेल्या लोकांनी तत्काळ त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला.मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.
त्यांना उडवण्यासाठीच कार आली होती का?
दरम्यान सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर वृद्धाची कोणतीही चूक नसल्याचे दिसते. रस्त्याच्या डाव्या बाजूने अगदी रत्याखालून ते जात होते. मात्र मागून येणारी कार केवळ त्यांना उडवण्यासाठीच खाली उतरली व नंतर पुन्हा रस्त्यावर आली असे फुटेज मध्ये दिसते. संबधित कारचालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.