एक नातं सहज जुळलेलं... वाचा खाकीच्या अनोख्या 'प्रेमा'ची स्‍टोरी!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मानवी स्वभावच असा आहे की संपर्क वाढला की आपोआप नातं जोडतो... कधी कधी हे नातं इतकं घट्ट होतं की मग ते तुटूच दिलं जात नाही. असाच काहीसा अनुभव बुलडाण्याच्या पोलीस दलातील जवानांनाही आला. अमरावतीला हिंसाचार थांबविण्यासाठी गेलेले जवान ज्‍या ठिकाणी राहिले, त्‍या वृद्धाश्रमातील माता-पित्‍यांशी त्‍यांचे घट्ट बंध जुळले. कर्तव्य आटोपून पुन्‍हा बुलडाण्याकडे निघाले तेव्हा त्‍यांच्‍या डोळ्यांतून अश्रू तरळले... वृद्धांना रूमाल टोपी, साडी, पातळ देऊन या जवानांनी त्‍यांचा जड अंतकरणाने निरोप घेतला.

त्रिपुरातील कथित घटनांच्या अफवांमुळे अमरावतीत हिंसक पडसाद उमटले होते. अकोला, यवतमाळ जिल्ह्यातही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुलडाणा पोलिसांचीही अतिरिक्त कुमक अमरावतीला पाठवण्यात आली होती. बुलडाणा जिल्ह्यातून गेलेल्या पोलिसांची व्यवस्था राष्ट्रसंत गाडगे महाराज वृद्धाश्रमात करण्यात आली होती. या कालावधीत बुलडाणा पोलीस आणि वृध्दाश्रमातील वृद्धांमध्ये कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले. कर्तव्य कालावधी आटोपून निघताना आश्रमातील वृद्ध माता-पित्यांना गहिवरून आले होते. निरोप घेताना बुलडाणा पोलीस दलातील जवानांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना म्हणून वृद्धांना रुमाल टोपी, साडी, पातळ देऊन निरोप घेतला. एएसआय शेख अस्लम, पो.ना. नागेश अंभोरे, पो. काँ.  वायाळ, गणेश जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील जवानांच्या या सत्कार्याबद्दल कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले.