सैलानीत "जंतर मंतर छुमंतर" करणारा भोंदू भामटा अडकला पोलीसांच्या जाळ्यात! लिंबू कापून अंगावरून उतरवायचा, रुग्णाच्या हाता पायात ठोकल्या होत्या बेड्या, म्हणे "सब ठीक कर दुंगा...."

 
Krim

रायपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्यातच काय सगळीकडे स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे सांगत सामान्यांना लुबाडणारे काही कमी नाहीत. सैलानी बाबांच्या दर्गा परिसरात अशांची संख्या भरपूर आहे, मात्र श्रद्धेचे नावाखाली कोणी तक्रार द्यायला समोर येत नाही त्यामुळे अशा भोंदू भामट्यांचे फावते. आता मात्र रायपूर पोलिसांत एका भोंदू भामट्यावर पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी असे या भोंदू भामट्याचे नाव आहे. एका रुग्णाच्या आईने याप्रकरणाची तक्रार रायपूर पोलीस ठाण्यात दिली.

आरोपी इरफान शहा स्वतःला दिव्य शक्ती प्राप्त असल्याचा दावा करतो. त्यातून रुग्णांची फसवणूक करतो. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून सैलानी येथे श्रद्धेपोटी अनेक रुग्ण येतात. यातील बहुतांश मनोरुग्ण असतात. काही रुग्ण वर्ष वर्ष सैलानी येथेच राहतात.
    दरम्यान परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येनोली तांडा येथील सौ.सुमनबाई विठ्ठल जाधव यांचा नातू विक्की पुंडलिक जाधव याला मानसिक आजार जडला होता. काहींच्या सांगण्यावरून तो उपचारासाठी सैलानी येथे आला होता. तिथे भोंदू भामटा इरफान शहा याच्या जाळ्यात जाधव कुटुंब अडकले. इरफान ने विकी याला व त्याच्या आजीला सैलानीत एक रूम भाड्याने करून दिली. मी विकीला ठीक करतो असा दावा त्याने केला. त्यासाठी सैलानी बाब दर्गा येथे निंबु कापून तो विकीच्या अंगावरून उतरवत होता, जंतर मंतर छु छा करत होता. त्याने विकीच्या हातापायात बेड्या देखील ठोकल्या होत्या. या अघोरी उपचाराच्या नावाखाली तो दररोज विकीच्या आजीकडून १०० ते २०० रुपये उकळत होता. पोलिसांकडे याप्रकरणाचे व्हिडिओ फुटेज प्राप्त झाले होते. दरम्यान फसवणूक झाल्याची खात्री होताच विकीच्या आजीने रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून इरफान शहा विरुद्ध जादूटोणा विरोधी कायदाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार दुर्गेश राजपूत म्हणाले...
 नागरिकांनी कोणत्याही भोंदू बाबाला बळी पडू नये.आजारांवर उपचार रुग्णालयात करावे. सैलानी बाबा दर्गा येथे येऊन केवळ मनोभावे दर्शन घ्यावे. भोंदू बाबा लुबाडत असेल तर पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत केले आहे.