अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून शेळगाव आटोळच्या शेतकऱ्याची आत्महत्या! कर्जाऊ घेतलेले १ लाख रुपये परत देऊनही सावकाराने हडपली जमीन !
मृतक शेतकऱ्यांच्या नातेवाईकांचा चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या; म्हणाले, कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही..
मृतक शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर श्रीराम मिसाळ यांनी गावातील एका अवैध सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्याबदल्यात सुधाकर मिसाळ यांनी अर्धा एक्कर जमीन सावकाराला खरेदी करून दिली होती. व्याजासह रक्कम परत केल्यानंतर जमीन पुन्हा शेतकऱ्याच्या नावावर करून देण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने व्याजासह कर्जाची रक्कम सावकाराला परत केली, मात्र सावकाराने जमीन शेतकऱ्याला न देता हडप केली. मृतक शेतकऱ्याने वारंवार विनंती करूनही सावकाराने शेतकऱ्याचे काहीही ऐकले नाही. त्यामुळे सुधाकर मिसाळ यांनी आज, २५ फेब्रुवारीला दुपारी शेतात विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या पत्नी व मुलाच्या लक्षात येताच तातडीने उपचारासाठी चिखलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी सुधाकर मिसाळ यांनी पत्नी व मुलाला आपण सावकाराच्या जाचाला कंटाळून विष पिल्याचे सांगितले. उपचारादरम्यान सुधाकर मिसाळ यांचा मृत्यू झाला. दरम्यान मृतक शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी आता अवैध सावकारा विरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.