शेतातील झोपडीला आग लागल्यान शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू!

 
Hhejr
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतातील झोपडीला आग लागून ३५ वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना  दुधलगाव( ता. मलकापूर) शिवारात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या आगीत एका कुत्र्याचाही होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मलकापूर तालुक्यातील  दुधलगाव येथील शेतकरी गणेश विजय नारखेडे (३५) हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री उशीर झाल्याने ते झोपडीत झोपले होते. दरम्यान, झोपडीला आग लागून या आगीतच त्यांचा व एका कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाल्याची बाब सकाळी उघडकीस आली. सकाळच्या सुमारास शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही बाब निदर्शनास येताच या घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.

यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एफ.सी. मिर्झा, पोकॉ संदिप राखोंडे,सचिन दासर, प्रमोद पोलखरे, दिलीप तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. झोपडीला आग कशाने लागली ही बाब अस्पष्ट असली तरी मृतकाच्या हातात विद्युत वाहिनीची तार आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटच्या कारणामुळे आग लागली की, इतर दुसऱ्या काही कारणाने आग लागली, या दिशेने पोलीस यंत्रणा तपास करीत आहे. दरम्यान पोलिसांच्या वतीने घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकाला सुद्धा पाचरण करण्यात आले होते. तर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जागेवरच करण्यात आले.