वैद्यकीय शिक्षण नसतांना नकली डॉक्टरने भाड्याच्या खोलीत केला होता अर्धवट गर्भपात! गर्भपातासाठी "किट" पुरवणाऱ्या पश्चिम बंगालच्या "पिंट्या"ला बोराखेडी पोलिसांनी आणले उचलून!

 
kyghyh
मोताळा( संजय गरुडे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  कोणतीही परवानगी नसताना एका महिलेचा अवैधरित्या अर्धवट गर्भपात  करण्यात आला होता. मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील  नकली डॉक्टर ब्रिजलाल चव्हाण यांनी त्याच्या साथीदाराच्या मदतीने हे कांड केले होते. ५ वर्षाआधी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील एका महिलेचा त्याने राजूर येथील भाड्याच्या खोलीत गर्भपात केला होता. चव्हाण नकली डॉक्टर असल्याने ,त्याने कोणतेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसल्याने तो गर्भपात अर्धवट झाला होता. चव्हाणला गर्भपात करण्यासाठी किट पुरवणारा त्याचा साथीदार "पिंट्या" ५ वर्षांपासून  फरार होता. अखेर बोराखेडीचे ठाणेदार बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील किनगाव येथील महिलेला २ मुली होत्या. तिसऱ्यांदा गर्भधारणा झाल्यावर मुलाच्या हव्यासापोटी महिलेने आणि तिच्या पतीने गर्भलिंगनिदान चाचणी केली असता मुलीचा गर्भ असल्याचे निदान झाले. त्यावेळी गुळभेली येथील ब्रिजलाल चव्हाण याने राजूर येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत महिलेचा अवैध रित्या गर्भपात केला. वैद्यकीय शिक्षण नसताना गर्भपात केल्याने अर्धवट गर्भपात झाला.त्यामुळे महिलेला बुलडाणा येथील आबेद हुसेन यांच्या दवाखान्यात आणले. तिथे उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने डॉ.हुसेन यांनी महिलेला चव्हाण सोबत अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटल येथे पाठवले. तिथे महिलेवर शस्त्रक्रिया करून मृत अवस्थेतील मुलीचा गर्भ काढण्यात आला. याप्रकरणी आयकॉन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. याप्रकरणी तात्काळ संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती,मात्र या प्रकरणात चव्हाणला अवैध गर्भपात करण्यासाठी किट पुरवणारा पश्चिम बंगालचा पिंटू उर्फ प्रेमचंद विश्वास हा ५ वर्षांपासून फरार होता. पिंटू जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे आल्याची खात्रीशीर माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी कुऱ्हा येथे जावून आरोपी पिंट्याला बेड्या ठोकल्या. काल,१ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.