खामगावच्या भाजप-काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा! बाजार समिती मतदानावेळी केलेली झोंबाझोंबी आली अंगलट !

 
nfj

 खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाच्यावेळी काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये वाद झाला होता. वाद झाल्यानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये झोंबाझोंबी झाली. यावेळी तणाव निर्माण होऊन मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती. या घटनेस कारणीभूत असलेल्या चौघांविरोधात अखेर खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खामगावच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार  आकाश फुंडकर आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वातील पॅनलमध्ये काट्याची लढत झाली. मतदार पळविण्याच्या वादातून मतदान केंद्रावरच शुक्रवारी काँग्रेस आणि भाजप पदाधिकारी आपापसात भिडले होते. दरम्यान, यामुळे मतदान केंद्रात तणाव निर्माण होऊन मतदान प्रक्रियाही थांबली होती. दरम्यान, शहर पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

त्यानंतर पोलिस नायक रामेश्वर फासे यांनी तक्रार दिली. या तक्रारीनुसार झोंबाझोंबी करून शांतता भंग करणाऱ्या चौघांविरोधात भादंवि कलम १६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांविरोधात गुन्हा यात तुषार चंदेल (३२, रा. बालाजी प्लॉट), सोनू रवींद्र तिवारी (३४, रा. निर्मल टर्निंग). कृष्णा झामसिंग ठाकूर (रा. सतीफैल), भावेश खंडेलवाल यांचा समावेश आहे.