शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या गंभीर उबरहंडे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल! ४ दिवसांपासून फरार! पिडीत मुलीच्या आईने तक्रारीत केले "गंभीर" आरोप!

 पहिली बायको असताना विद्यार्थीनीसोबतच केले होते लगीन; लाखांचे दागिने गहाण ठेवले होते, रोज मारहाण करायचा! "त्या" दिवशी नेमके काय घडलं तेही सांगितलं...

 
hande
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २० वर्षीय मनीषा गंभीर उबरहंडे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा शहरातील साईनगरात ३ मार्चच्या संध्याकाळी घडली होती. दरम्यान याप्रकरणी विवाहितेचा पती रायपूर जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असलेल्या गंभीर उबरहंडे विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. स्वतः बुलडाणा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. मनिषाची आई यशोदाबाई जनार्धन जाधव (रा. अंचरवाडी)यांनी  या प्रकरणाची तक्रार बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. गेल्या ४ दिवसांपासून गंभीर उबरहंडे फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

यशोदाबाईंनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी अंचरवाडी जिल्हा परिषद शाळेत शिकत होती, त्यावेळी गंभीर उबरहंडे हा तेथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. तेव्हापासून त्याची वाईट नजर मुलीवर होती. मनीषा ७ व्या वर्गात होती तेव्हापासूनच गंभीर उबरहंडे याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर ७ डिसेंबर २०१९ ला दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन मंदिरात लग्न केले. बुलडाणा तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत मध्ये दोघांच्या विवाहाची नोंद सुद्धा करण्यात आली होती, त्यानंतर दोघे बुलडाणा शहरातील साईनगरात राहत होते.
    
 गंभीर उबरहंडे याचे आधी लग्न झालेले होते मात्र त्याने पहिल्या बायकोबद्दल व मुलाबद्दल काहीही सांगितले नव्हते असा आरोपही तक्रारीत करण्यात आलेला आहे. गंभीर ने मनिषाला दोन वर्षे चांगले वागवले मात्र मागील एका वर्षांपासून तो मनिषाला तू हलक्या जातीची आहे  असे म्हणून भांडण करायचा व मारझोड करायचा. गंभीर उबरहंडे याने शेताच्या पेरणीसाठी मनिषाच्या १ लाख रुपयांच्या दोन पोथा गहाण ठेवल्या होत्या. मनीषा त्यांना पोथा सोडवून आणा असे म्हणत होती तेव्हा तो तिला मारझोड करायचा. मनीषाने याबद्दल तिच्या आईला फोन करून सांगितले व बुलडाण्याला बोलावून घेतले. त्यामुळे तिची आई २८ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे आली होती, व मनीषाकडे राहत होती. 
     "त्या" दिवशी नेमक काय झालं..!

यशोदाबाईंनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ३ मार्चच्या दुपारी साडेचारला त्या मेडिकलवर गोळ्या आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मनिषा घरी एकटीच होती. संध्याकाळी साडेपाचला त्या गोळ्या घेऊन घरी आल्या तेव्हा मनिषाने बेडरूमचा दरवाजा बंद केला होता. आवाज देऊनही ती दरवाजा उघडत नव्हती.  त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता मनिषाचा पती गंभीर उबरहंडे तिथे आला. त्याने लाथ मारून दरवाजा तोडला तेव्हा मनीषा ही सीलिंग फॅनला गळ्याभोवती स्टॉल ने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. गंभीर उबरहंडे याने तिला फासावरून खाली उतरवले त्यावेळी तिचा मृत्यू झालेला होता. मनिषाने गंभीर उबरहंडे याच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केली असल्याचा स्पष्ट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बुलडाणा शहर पोलिसांनी गंभीर उबरहंडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवसापासून तो फरार आहे.