शेळगाव आटोळचा अवैध सावकार अनिल दौलत तिडके विरुद्ध गुन्हा दाखल! व्याजासहित पैसे परत करूनही जमीन हडपल्याने शेतकरी सुधाकर मिसाळ यांनी केली होती आत्महत्या

 
andhera
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून  सुधाकर श्रीराम मिसाळ (५५, रा. शेळगाव आटोळ ता.चिखली) या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे काल, २५ फेब्रुवारीला दुपारी दोनला  घडली होती. अवैध सावकाराविरुद्ध जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता. अखेर रात्री उशिरा मृतक शेतकऱ्याची पत्नी सिंदुबाई सुधाकर मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेळगाव आटोळचा अवैध सावकार अनिल दौलत तिडके याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 मृतक शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर श्रीराम मिसाळ यांनी एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अनिल तिडके या अवैध सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्याबदल्यात सुधाकर मिसाळ यांनी अर्धा एक्कर जमीन सावकार अनिल तिडके याला खरेदी करून दिली होती. व्याजासह रक्कम परत केल्यानंतर जमीन पुन्हा शेतकऱ्याच्या नावावर करून देण्याचे ठरले होते.

ठरल्याप्रमाणे  शेतकऱ्याने व्याजासह कर्जाची रक्कम तिडके याला परत केली, मात्र तिडके याने जमीन शेतकऱ्याला न देता हडप केली. मृतक शेतकऱ्याने वारंवार विनंती करूनही तिडके याने शेतकऱ्याचे काहीही ऐकले नाही. त्यामुळे सुधाकर मिसाळ यांनी काल, २५ फेब्रुवारीला दुपारी शेतात विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या पत्नी व मुलाच्या लक्षात येताच तातडीने उपचारासाठी चिखलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी सुधाकर मिसाळ यांनी पत्नी व मुलाला आपण सावकाराच्या जाचाला कंटाळून विष पिल्याचे सांगितले.

उपचारादरम्यान सुधाकर मिसाळ यांचा मृत्यू झाला. दरम्यान मृतक शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी अवैध सावकारा विरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. अखेर चिखली पोलिसांनी मध्यस्थी करून सावकार तिडके विरुद्ध तक्रार देण्यासाठी अंढेरा पोलीस ठाण्यात सल्ला मृतक शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिली. रात्री उशिरा तिडके याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शेतकऱ्याचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी शेळगाव आटोळ येथे नेण्यात आले.