दारूची बाटली पोटात घुसली! ट्रकक्लिनर युवकाचा करुण अंत; तडफडत सुटला देहातून प्राण ! नांदुऱ्या जवळची धक्कादायक घटना..

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ट्रकक्लीनरचे काम करणारा नितीन विधाते (रा. बाळापुर फैल खामगाव) हा अचानक पळत सुटल्याने फिट येवून दारूच्या बाटलीवर आदळला. यामध्ये, दारूच्या बाटलीच्या काचा फुटून पोटात घुसल्याने दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. ही घटना नांदुरा जवळ वडनेर भोलजी नजीक गावाजवळ घडली.

 याबाबत ट्रक चालक गजानन बबन वसु यांनी नांदुरा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, नितीन शिवाजी विधाते (४० वर्ष) हा वसू यांच्याकडे ट्रक क्लीनरचे काम करतो. मात्र तो दारू पिण्याच्या सवयीचा असून, त्याला फिट येतात. दरम्यान ट्रकचालक  वसु आणि नितीन विधाते हे दोघे ट्रकने गुजरातवरून खामगावकडे येत होते. नितीन विधाते याला अचानक फिट आली. त्यामुळे त्याचे हात बांधून ठेवले होते. यानंतर, वडनेर भोलजी गावानजीक नितीन हा ट्रक मधून उतरला आणि नदीच्या दिशेने पळत सुटला. पळताना तो अचानक खाली कोसळला आणि त्याच्या कमरेला लागलेली दारूची शिशी फुटली. दारूच्या शिशीचे काच फुटल्याने नितीनच्या कमरेत व पोटात त्या  काचा घुसल्या. नितीनच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. यातच तडफडून नितीनचा मृत्यू झाला असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी, आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.