नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागला युवा शेतकरी! टोकाचा निर्णय घेतला; देऊळगाव घुबे येथील हृदयद्रावक घटना

 
yyh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत विष प्राशन केले. उपचारादरम्यान शेतकऱ्याचा आज ,८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येठी ही घटना घडली.  राहुल दगडूबा घुबे(३३, रा. देऊळगाव घुबे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

राहुल घुबे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती होती,त्यातच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते. प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यांच्यावर इंडियन ओव्हरसीस बँकेचे कर्ज असल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे राहुल घुबे सतत नैराश्यात होते.

५ सप्टेंबर रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल घुबे यांच्या पश्यात आई, वडील, पत्नी व सात वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.