व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीची "हिस्ट्री' ऐकूनच तुमच्या काळजाचं होईल पाणी!; एकाच्या नावावर खून अन्‌ दरोड्याचे २६ गुन्हे!!; बुलडाणा LCB ने अशा आवळल्या मुसक्या...

 
456
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून डोळ्यांत मिरची पावडर टाकून लुटल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील लालमाती ते रोहिणखेड रोडवर २८ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. व्यापाऱ्याकडून  सोनेचांदीचे दागिने व रोख असा एकूण ३ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला होता. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या  आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावला असून, ७ दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली आहे. अटक केलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यातील एकाविरुद्ध तर खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत.

मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार येथे रोहिणखेड येथील विजय नारायण सुरपाटणे (५२) यांचे अलंकार ज्वेलर्स नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. दुकान बंद करून ते सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन दुचाकीने घराकडे जात होते. लालमाती ते रोहिणखेड रोडवर लालमाती शिवारात दोघांनी पाठलाग करून त्यांची दुचाकी अडवली होती. त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दागिने आणि रोख रकमेची बॅग घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, धामणगाव बढेच्या ठाणेदारांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. ३१ मार्चला दोन संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली होती. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोताळा तालुक्यातील जनुना येथून राजेंद्र सुपडा चंडोल व जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथून कृष्णा नारायण मुरडकर या दोघांना ताब्यात घेतले.

दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यात आणखी ५ साथीदारांचा सहभाग असल्याचे सांगत त्यांची नावे सांगितली. दुकान बंद करून सोनार ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्याची दरोडेखोरांनी आधीच रेकी केली होती. संधी मिळताच दरोडखोरांनी सोनाराला लुटल्याचे चौकशीत समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेने सातही आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून आतापर्यंत सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे आहेत दरोडेखोर...
कृष्णा नारायण मुरडकर, स्वप्नील विष्णू गवळी (दोघे रा. वालसावंगी, जि. जालना), ताराचंद तुळशीराम कचरे (रा. नांदलगाव, जि. औरंगाबाद), सुरेश गजानन झाल्टे (रा. बोरखेड, ता. बुलडाणा), विशाल संतोष वाघ (रा. कोराळा बाजार, ता. मोताळा), मुकेश ओंकार बस्सी (रा. तरोडा, ता. मोताळा), राजेंद्र सुपडा चंडोल (रा. जनुना, ता. मोताळा) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. यातील कृष्णा नारायण मुरडकर याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरुपाचे २६ गुन्हे औरंगाबाद व बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

यांनी केले दरोडेखोरांना जेरबंद...
ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक अमित वानखेडे, सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, सहायक पोलीस निरिक्षक चंद्रकांत ममताबादे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष गद्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर महाजन, पोहेकाँ दीपक लेकुरवाळे, नापोकाँ गणेश पाटील, नापोकाँ विजय वारुळे, नापोकाँ जगदेव टेकाळे, नापोकाँ पुरुषोत्तम आघाव, पोकाँ गजानन गोरले, पोकाँ गणेश शेळके, पोकाँ वैभव मगर, पोकाँ सुरेश सोनुने, पोकाँ शरद बाठे, पोकाँ धीरज चंदन, पोकाँ राजू आडवे, पोकाँ दामोधर लठाळ, महिला पोकाँ सरिता वाकोडे, चालक नापोकाँ शिवानंद मुंढे, नापोकाँ संदीप जाधव यांनी पार पाडली.